विद्या करणार मराठी सिनेमात प्रमुख भूमिका ! - Marathi News 24taas.com

विद्या करणार मराठी सिनेमात प्रमुख भूमिका !

www.24taas.com, मुंबई
 
आपल्या ऐन बहराच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीकडे ढुंकूनही बघायचं नाही आणि  हिंदीमध्ये काम मिळेनासं झालं की मराठी सिनेमांकडे वळण्याची मराठी अभिनेत्रींची पद्धत मोडीत कढतेय ती साक्षात 'विद्या बालन'! 'डर्टी पिक्चर', 'कहानी'सारखे हटके चित्रपट आपल्या धमाकेदार परफॉर्मंसने गाजवल्यावर विद्या बालन सध्या खान, कपूर आणि बच्चन्सनासुद्धा भारी पडत आहे. तमाम हिंदी प्रेक्षकांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा असताना या टॉपच्या अभिनेत्रीला मात्र वेध लागले आहेत ते मराठी सिनेमाचे !
 
कुठल्याही सिनेमासाठी सध्या प्रोड्युसर्सची पहिली पसंती आहे ती विद्या बालनलाच. विद्याने आत्तापर्यंत परिणिता, पा, इश्कियाँ, डर्टी पिक्चर आणि नुकत्याच हिट झालेल्या ‘कहानी”मधून आपल्या अभिनयाचा झंजावात निर्माण केल्यावर आगामी 'घनचक्कर' सिनेमात विनोदी भूमिका करणार आहे. या शिवाय 'मेहरुन्निसा' या सिनेमात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूरसारख्या बाप अभिनेत्यांना ती टक्कर देणार आहे. पण, याहूनही तिला जास्त उत्सुकता आहे ती मराठी सिनेमात काम करण्याची. त्यासाठी महेश मांजरेकर यांच्याशी ती संपर्कात आहे. फिल्मचं पूर्ण स्क्रिप्ट हातात पडताच ती काम करायला सुरूवात करणार आहे.
 
“ज्या राज्याने, शहराने मला प्रसिद्धी मिळवून दिली, त्या राज्याच्या भाषेला आदरांजली देण्यासाठी म्हणून मराठी सिनेमा करण्याची माझी पहिल्यापासूनच इच्छा होती. महेश मांजरेकरांशी बोलल्यावर काम करायचं नक्कीही झालंय.” असं विद्या म्हणाली.
 
मराठी सिनेमात येणारे नवे प्रवाह, वैविध्यपूर्ण कथा, वेगळे प्रयत्न करायला मिळणारा वाव यामुळे विद्याला मराठीत काम करायला आवडेल हे नक्कीच !  यापूर्वी विद्याने बंगाली सिनेमात काम केलं आहे. आणि आता फेरारी की सवारीमध्ये आयटम साँग करतानाही विद्याने मराठी लावणीचाच ठेका धरलाय. तेव्हा अभिनयसंपन्न विद्या बालनचं मराठी सिनेमात आगमन हा तिच्यासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठीही प्रचंड एक्सायटिंग असणार हे नक्की !
 

First Published: Thursday, March 15, 2012, 10:09


comments powered by Disqus