Last Updated: Wednesday, November 23, 2011, 17:42
झी २४ तास वेब टीम, मुंबई भारतात मुलगा वंशाचा दिवा असतो हा समज आणि त्यापायी दरवर्षी पाच लाख मुलींची भ्रुणहत्या होते हे सर्वश्रुतच आहे. पण बिग बी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मुलीचे स्वागत ज्या उत्साहाने केलं त्यामुळे मुलींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात मोठा बदल घडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लक्ष्मीचे आमच्या घरी आगमन झालं आहे आणि आम्ही लक्ष्मी रत्नलाच घरी आणलं अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली. यामुळे योग्य तो संदेश पोहचल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. स्वंयसेवी संस्था समाजात बदल घडवण्यासाठी संदेश द्यायचा असल्यास अनेकदा सेलिब्रिटीजना ब्रँड ऍम्बासॅडर म्हणून नेमतात. पोलिओ निर्मुलनाची मोहिम अमिताभ बच्चन ब्रँड ऍम्बासॅडर असल्यामुळे यशस्वी आणि प्रभावी ठरली.
ऐश्वर्याने मुलीला जन्म दिल्यानंतर टीव्ही हॉस्ट मिनी माथूरने मुलीच्या जन्माचे स्वागत राष्ट्राने ज्या पध्दतीने केलं त्याने माझं मन भरून आलं अशी प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली. आणि असचं प्रेम आणि वात्सल्य सर्व छोट्या परी यांना लाभेल अशी आशा तिने व्यक्त केली. देशात मुलींच्या भ्रुणहत्या राजरोसपणे घडत असताना सेलिब्रिटी मात्यापित्यांच्या पोटी आलेल्या मुलीमुळे सकारात्मक बदल घडेल अशी भावना गुल पनागने व्यक्त केली आहे. अभिषेक आणि त्याची आई जया बच्चन या दोघांनाही मुलगीच हवी होती.
काही वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली वाराणसी इथे एका समारंभात अमिताभने मुलाचं लग्न व्हावं आणि त्याला मुलगा व्हावा असं वक्तव्य केलं होतं त्यावरुन मोठा गदारोळ माजला होता आणि त्याच्यावर तीव्र टीकाही झाली होती. पण या सगळ्यांना चुकीचं ठरवत अमिताभने नात झाल्यानंतर मी एका सुंदर गोंडस लहानुलीचा आजोबा झालो दादाजी झाल्याने आनंदित झाल्याचं टविट केलं. बच्चन यांचा जनमानसावर असलेल्या प्रभावामुळे लोकांच्या मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
First Published: Wednesday, November 23, 2011, 17:42