हृतिक महाराष्ट्राचा 'ब्रँड अँबेसॅडर'? - Marathi News 24taas.com

हृतिक महाराष्ट्राचा 'ब्रँड अँबेसॅडर'?

www.24taas.com, मुंबई
 
आत्तापर्यंत आपण अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेश आणि गुजराथचे ब्रँड अँबेसॅडर झालेलं पाहिलं आहे. नुकताच शाहरुख खानही बंगालचा ब्रँड अँबेसॅडर बनला आहे. आमीर खानही ‘अतिथी देवो भवः|’ म्हणत भारताचं गुणगान करत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसॅडर बनण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रमोट करण्यासाठी हृतिक रोशनला विचारण्यात आलं आहे.
 
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याचा 'ब्रँड अँबेसॅडर' होऊन महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर प्रतिमा आणखी ठळक करावी, यासाठी हृतिकच्या टीमला काही दिवसांपूर्वी इ-मेल केला आहे. या इ-मेलचं महत्त्व लक्षात घेत हृतिकच्या टीमनेही तो मेल तात्काळ हृतिकला फॉरवर्ड केला आहे.
 
मात्र, हृतिक सध्या आपल्या क्रिश-३च्या शुटिंगमध्ये प्रचंड बिझी असल्यामुळे त्याला यातून वेळ काढता येणं कठीण आहे. कारण ब्रँड अँबेसॅडरच्या प्रकल्पांतर्गत हृतिकला महाराष्ट्रावरील माहितीपटामध्ये काम करावं लागणार आहे. यामध्ये त्याला कोल्हापूर, महाबळेश्वर, रायगड आणि मुंबई या ठिकाणांवर हा माहितीपट असणार आहे. तसंच, यासाठी हृतिकला खास फोटोशूटही करावं लागणार आहे.
 
हृतिकला यासाठी वेळ काढता येणं कठीण असलं, तरी हृतिकला शासनाकडून आलेल्या या प्रस्चावामुळे खूप आनंद झाला आहे आणि हृतिकला हा प्रस्ताव म्हणजे आपला बहुमान वाटत असल्याचं हृतिकच्या काही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. हृतिकने आत्तापर्यंत आपल्या अभिनयाने, दिसण्याने, वागण्या-बोलण्याने, स्टाईलने सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे. जर असा चेहरा महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून लाभला तर, महाराष्ट्राची प्रतिमा आणखी ग्लॅमरस होईल यात शंकाच नाही.
 
 

First Published: Thursday, April 26, 2012, 18:41


comments powered by Disqus