महाराष्ट्रासाठी माधुरी कडूच - Marathi News 24taas.com

महाराष्ट्रासाठी माधुरी कडूच

www.24taas.com, मुंबई
 
कुणी ब्रॅण्ड अँबेसेडर होता का ब्रॅण्ड अँबेसेडर...अशी वेळ आलीय ५२ वा वर्धापन दिन साज-या करणा-या महाराष्ट्रावर...मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सा-यांना वेड लावणारी धक धक गर्ल माधुरी महाराष्ट्राची खरी ओळख....असं तुम्हा-आम्हाला वाटतं. मात्र हीच भावना त्यांच्या मनातही आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण या मराठमोळ्यांना महाराष्ट्राचं ब्रँन्ड अँम्बेसेडर होण्यासाठी वेळच नाही.
 
मराठी मुलगी म्हणवणा-या माधुरीनं तर चक्क १० कोटी रुपयांच्या घसघशीत मानधनाची मागणी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर शुटिंग दरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलचा स्टेदेखील तिला हवाय. तिच्या मागणीनं मात्र महाराष्ट्र सरकारचे डोळेच पांढरे झाले आहेत. अमिताभ, आमिर शाहरूखसारख्या महागड्या स्टार्सनं जनतेच्या हितार्थ एकही पैसा न घेता अनेक कॅम्पेन्स केली आहेत. त्यामुळं आमची मराठमोळी माधुरी तरी कसं मानधन घेणार?  असा गोड गैरसमज सरकारला होता.
 
ही बया एवढ्यावरच थांबली नाही. तिनं राज्य सरकारच्या पुरस्कार सोहळ्यालाही दांडी मारली...विशेष म्हणजे तिलाही पुरस्कारानं गौरवण्यात येणार होतं. मात्र पुरस्कार सोहळ्यात सरकार ब्रँड एम्बेसेडर होण्यासाठी गळ घालणार की काय या भितीनंच तिनं दांडी मारणं पसंत केल्याचं बोललं जातय. मात्र तिच्या गैरहजेरीवर उपमुख्यमंत्र्यानी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.
 
 
तर दुसरीकडं आपल्या लाडक्या सचिनलाही पर्यटन खात्याचा ब्रँड एम्बेसेडर होण्यासाठी वेळ मिळत नाहीए. गेल्या दोन वर्षांपासून सरकार त्याच्या मागे लागलंय पण सचिनला साधी चर्चा करायलाही सवड नाहीये. अमिताभ, आमिर आणि शाहरूखसारख्या बिझी स्टार्सनं सामाजिक बांधिलकी जपून अनेक अभियानं चालवली. आपल्या मराठमोळ्या बावन्नकशी माधुरीनंही ५२ व्या महाराष्ट्रा दिनानिमित्तानं अशीच बांधिलकी जपावी अशी अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे.
 

First Published: Tuesday, May 1, 2012, 11:21


comments powered by Disqus