जॉन अब्राहम शिक्षेतून सुटला - Marathi News 24taas.com

जॉन अब्राहम शिक्षेतून सुटला

www.24taas.com,  मुंबई
 
 
भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून दोघांच्या दुखापतीस कारणीभूत झाल्याने ‘धूम’फेम अभिनेता जॉन अब्राहम याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या १५ दिवसांच्या कारावासाच्या शिक्षेवर सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयानेही सोमवारी शिक्कामोर्तब केले. मात्र जॉनचा प्रामाणिकपणा आणि कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे लक्षात घेऊन त्याला शिक्षा होवू शकली नाही.
 
 
जखमी झालेलेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जॉन ची शिक्षा रद्द करण्याकरिता दर्शविलेली अनुकूलता, स्वत: जॉनने पळून न जाता जखमींना रुग्णालयात नेण्याचा दाखविलेला प्रामाणिकपणा  आदी बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने ‘प्रोबेशन’वर जॉन ची सुटका केली.  न्यायालयाच्या निर्णयामुळे जॉनचा तुरुंगावास टळला आहे.
 
 
२००६ साली जॉनने वांद्रे येथे ‘धूम स्टाईल’ मोटारसायकल चालवीत तन्मय माझी आणि श्याम कसबे या दोन महाविद्यालयीन तरुणांना धडक दिली होती. दोन्ही तरुण त्यात किरकोळ जखमी झाले होते. या प्रकरणी जॉनवर निष्काळजीपणे गाडी चालवून दोघांना दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ३९ वर्षीय जॉनला कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवून १५ दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. मार्च महिन्यात सत्र न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करीत त्याचा जामीन रद्द करून तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.
 
 
मात्र जॉनने उच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज व शिक्षेविषयी फेरविचार याचिका केली. त्या वेळी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी जामीन मंजूर करीत त्याची शिक्षाही स्थगित केली होती. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी कनिष्ठ न्यायालयाने जॉनला सुनावलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. गेल्या सुनावणीत दोन्ही जखमी व त्यांच्या कुटुंबीयांना जॉनची शिक्षा व नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
 
दोन्ही जखमींच्या वतीने जॉनची शिक्षा रद्द करण्यास आपली हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्यात आले. परंतु संपूर्ण खटला चालल्यानंतर परस्पर सामंजस्याने हे प्रकरण निकाली काढणे योग्य नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने त्याची शिक्षा कायम केली. तसेच अशा अपघातांसाठी चालकच जबाबदार असून त्यांनी असे अपघात टाळण्यासाठी नेहमीच गाडीवर नियंत्रण ठेवायला हवे, असेही मत निकाल देताना नोंदवले.
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 12:36


comments powered by Disqus