'हिरॉईन'चे स्टार वॉर! - Marathi News 24taas.com

'हिरॉईन'चे स्टार वॉर!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
अभिनेत्रींमधलं स्टार वॉर बॉलिवूडला काही नवं नाही आणि आता हे स्टार वॉर रंगतंय ते करीना कपूर आणि ऐश्वर्या रायमध्ये. मधुर भांडारकरचा बहुचर्चित 'हिरोईन' सिनेमा आधी करीना कपूरला ऑफऱ करण्यात आला मात्र करीनाच्या नखऱ्यांना न जुमानता मधुर भांडाकरने या सिनेमातून तिला डच्चू दिला आणि कान्ससारख्या प्रतिष्ठीत सोहळ्यात ऐश्वर्या रायसह या सिनेमाची दणक्यात घोषणा केली.
 
मात्र ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीनंतर  मधुरला पुन्हा करीनाकडेच ही भूमिका घेऊन जावं लागलं आणि करीनाने हा सिनेमा करण्यास होकारही दिला. या सिनेमाचं शूटिंगही करीनाने नुकतंच सुरू केलंय. मात्र करीना हा सिनेमा करण्यासाठी सहज तयार कशी झाली, याचीही चर्चा दरम्यान इंडस्ट्रीमध्ये रंगत होती, तेव्हा यावर कोणीच उघ़डपणे भाष्य करत नव्हतं. मात्र आता याचं खरं कारण समोर येतेय आणि ते म्हणजे हा सिनेमा करण्यासाठी करीनाने चांगलंच मानधन घेतलंय.
 
ऐश्वर्याला सिनेमातून डच्चू दिल्यानंतर करीनाला कास्ट करण्याशिवाय मधुरकडे कोणता दुसरा पर्याय नव्हता आणि ही संधी करीनाने चांगलीच एन्कॅश केलीय. ते ही ३-४ कोटींमध्ये नाही तर या सिनेमासाठी करीनाने तब्बल सात कोटी रुपये घेतले असल्याचं बोललं जातंय. करीनाने गेल्या वर्षापासून हिट फिल्मची रांगच लावलीय. त्यामुळे साहजिकच करीनाचा भावही चांगलाच वधारलाय.

एकूणच 'हिरोईन'चा ताज करीना कपूरच्या डोक्यावर चढल्यानंतर करीनाने फक्त भूमिकेमध्येच नाही तर मानधनामध्येही ऐश्वर्याला मात दिलीय. कारण रोबोट सिनेमासाठी ऐश्वर्याला ६ कोटी रुपये मिळाले होते तर हिरोईनसाठी करीना सात कोटी रुपये वसुल करतेय. एकूणच 'हिरोईन'च्या निमित्ताने रंगलेल्या या स्टार वॉरमध्ये सध्या तरी करीनाने ऐश्वर्याला मागे टाकलंय.

First Published: Tuesday, November 29, 2011, 12:09


comments powered by Disqus