'अजिंठा'चा मार्ग मोकळा - Marathi News 24taas.com

'अजिंठा'चा मार्ग मोकळा

www.24taas.com, मुंबई
 
कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'अजिंठा' सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट देऊन मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला सेन्सॉर बोर्डाने  पूर्णविराम दिला. बंजारा समाजाने आक्षेप घेतल्याने 'अजिंठा'ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते आणि त्यामुळेच ऐनवेळी सिनेमाचा प्रीमियर रद्द करण्यात आला होता.
 
सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळताच नितीन देसाई  यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तत्पूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या नऊ सदस्यांना  'अजिंठा' दाखवला गेला आणि त्यांनी सिनेमाला ग्रीन सिग्नल दिला. 'अजिंठा'मध्ये बंजारा समाजाच्या तरुणीला तोकडे कपडे घालून दाखवण्यात आल्याबद्दल तसेच बंजारा समाजाचे दैवत मानले जाणार्‍या सेवालाल महाराजांची प्रतिमा भुतासारखी दाखवल्याबद्दल बंजारा समाजाच्या संजीव राठोड यांनी आक्षेप घेतला होता.
 
नितीन देसाईं यांनी  'अजिंठा'वर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन करत सिनेमाची नायिका पारो ही भारतीय संस्कृतीची मुलगी असल्याने तिचा कोणत्याही समाजाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे  त्यांनी म्हटले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आपला संपूर्ण विश्‍वास असून आज तो सार्थ ठरल्याची भावनाही देसाईंनी व्यक्त केली.
 

First Published: Friday, May 11, 2012, 09:31


comments powered by Disqus