`हम पाँच`नंतर पुन्हा हसवणार विद्या बालन Vidya ready to tickle funny bone again

`हम पाँच`नंतर पुन्हा हसवणार विद्या बालन

`हम पाँच`नंतर पुन्हा हसवणार विद्या बालन
www.24taas.com, मुंबई

अभिनेत्री विद्या बालनला आपण आत्तापर्यंत संवेदनशील आणि काहीवेळा बोल्ड भूमिकांमध्ये पाहिलं आहे. मात्र प्रथमच विद्या बालन एका विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नेहमी गंभीर भूमिका करणारी विद्या या वेळी `घनचक्कर` नामक सिनेमात विनोदी भूमिका साकारणार आहे.

आपल्या आगामी सिनेमाबद्दल विद्या बालन भलतीच खूष आहे. या सिनेमाबद्दल बोलताना विद्या बालन म्हणाली, “आधी मी मनातून फार घाबरले होते. कारण, प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं, पण त्यांना हसवणं महाकठीण. पण मी माझ्या भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”

‘घनचक्कर’ सिनेमात विद्या बालनसोबत इम्रान हाश्मी दिसणार आहे. यापूर्वी द डर्टी पिक्चर सिनेमात ही जोडी पाहायला मिळाली होती. नो वन किल्ड जेसिका सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता हे घनचक्कर सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. विद्या बालनचे परिणिता, पा, कहानी, डर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसिका यांसारखे सिनेमे गंभीर प्रकृतीचे होते. लगे रहो मुन्नाभाई, हे बेबी, किस्मत कनेक्शन, भूलभुलैय्या, इश्कियाँ यांसारख्या विनोदी ढंगाच्या सिनेमांमध्ये विद्याने जरी काम केलं असलं, तरी तिची भूमिका फारशी विनोदी नव्हती. त्यामुळे विनोदी भूमिकेत विद्या प्रथमच दिसणार आहे.

मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी विद्या बालन झी टीव्हीवरच्या ‘हम पाँच’ या लोकप्रिय विनोदी मालिकेत गमतीदार भूमिकेमध्ये दिसली होती. त्यामुळे इतक्या वर्षांनी पुन्हा तशा भूमिकेत तिला पाहायला प्रेक्षकांनाही आवडेल.

First Published: Tuesday, October 30, 2012, 13:47


comments powered by Disqus