सलमान-शाहरुख : पुन्हा एकदा गळाभेट!, When Salman, Shah Rukh hugged once again!

सलमान-शाहरुख : पुन्हा एकदा गळाभेट!

सलमान-शाहरुख : पुन्हा एकदा गळाभेट!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमधले दोन दबंग ‘खानां’मध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर आता हळूहळू संपत चालल्याचं चित्र आहे. मुंबईत आयोजित केल्या गेलेल्या गिल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि शाहरुख खान या दोहोंना पुन्हा एकदा एकमेकांना गळाभेट देताना पाहायला मिळालं.

एव्हढंच नव्हे, तर सलमाननं शाहरुखकडूनही ‘जय हो’ वदवून घेतलं, हे त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. शाहरुखनंही आपल्या मित्राच्या आग्रहाचा मान राखत ‘जय हो’ म्हटलं. सलमान-शाहरुखनं एकमेकांना मिठी मारली आणि उपस्थितांमध्येही टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अनेकांनी शाहरुख-सलमान यांच्या या गळाभेटीवर आश्चर्य व्यक्त करत आनंद व्यक्त केलाय.

दबंग सलमाननं शाहरुखचं त्याच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या यशासाठी अभिनंदन केलं आणि आपल्या ‘जय हो’ या सिनेमासाठी त्याच्याकडून शुभकामनाही मागितल्या. सलमानचा ‘जय हो’ या महिन्यात २४ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

मागच्या वर्षीही (२०१३ मध्ये) एका इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुख यांनी एकमेकांना मिठी मारून शुभकामना दिल्या होत्या. त्यावेळी, सलमानचे वडील सलीम खान यांनी मात्र, ही मैत्री नसून केवळ एक शिष्टाचार असल्याचं म्हणत ते दोघं कधीही एकमेकांचे चांगले मित्र बनू शकत नाहीत कारण ते एकमेकांचे प्रतिद्वंदी असल्याचीही पुष्टी जोडली होती. मात्र, बाबा सिद्धिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी दरम्यान सलमान – शाहरुखनं एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

सहा वर्षांपूर्वी २००८ साली कटरीना कैफ हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान आणि शाहरुख यांच्यात जोरदार भांडण झालं होतं... दोघंही हमरी-तुमरीवर आलेले दिसले. तेव्हापासूनच त्यांच्यातील संबंध दुरावले गेले होते आणि दोघांमध्येही कोल्डवॉर सुरू झालं होतं.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 17, 2014, 15:42


comments powered by Disqus