Last Updated: Wednesday, November 14, 2012, 13:58
www.24taas.com, मीरपूरवेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलनं कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा विश्वविक्रम केला आहे. बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात ख्रिस गेलने ही किमया केली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मिरपूर कसोटीत वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात ख्रिस गेल आणि किरॉन पॉवेलने केली. गेलला झटपट बाद करण्यासाठी बांगलादेशचा कर्णधार रहीमनं पहिले षटक नवोदित ऑफ स्पिनर सोहाग गाझीला दिले. पण, ख्रिस गेलनं हा कसोटी सामना आहे आपण सुरूवातीचे काही चेंडून खेळू काढू आणि मग प्रहार करू असा कोणताही विचार न करता त्याच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनला खणखणीत षटकार खेचला. कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
मात्र, गेलच्या या विक्रमानंतर रहीमची खेळीही कामी आली आणि गाझीनं या मानहानीचा पाचव्या ओव्हरमध्ये वचपा काढला. त्यानं गेलला मोहमदुल्लाकरवी झेलबाद केलं. गेलनं १७ चेंडूत २ चौकार आणि दोन षटकार तडकावून २४ धावा केल्या.
ख्रिस गेल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर पॉवेलनं सगळी सूत्रं आपल्या हाती घेत झंझावाती शतक झळकावलं. या शतकाच्या जोरावर विंडिजनं पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३६१ पर्यंत मजल मारली होती.
First Published: Wednesday, November 14, 2012, 13:54