ट्वेण्टी-20 : आज भारत-श्रीलंकामध्ये महामुकाबला

ट्वेण्टी-20 : आज भारत-श्रीलंकामध्ये महामुकाबला

ट्वेण्टी-20  : आज भारत-श्रीलंकामध्ये महामुकाबला
www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर

मीरपूरमध्ये ट्वेण्टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत रंगणार आहे. या महामुकाबल्यात धोनीची टीम इंडियाही श्रीलंकेचं आव्हान पेलण्यास तयार आहे. बांगला देशातील मीरपूरमध्ये आज संध्याकाळी साडेसहा वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे.

टीम इंडियाने पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाला हरवून फायनल गाठली आहे.

भारत आणि श्रीलंकेत तीन वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 रोजी वन डे विश्वचषकासाठी अंतिम सामना झाला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात कर्णधार धोनीने विजयी षटकार ठोकून विश्वचषक जिंकला होता.

मीरपूरमध्ये आज होणाऱ्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंकेचे संघच एकमेकांसमोर उभे आहेत. पण यावेळी परिस्थिती नेमकी उलट आहे. 2011 सालच्या वन डे विश्वचषकात भारताच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूं होते, तर लंकेचा संघ तुलनेने नवखा होता.

आता मात्र सचिन, झहीर, सेहवाग, गंभीर, हरभजन हे दिग्गज भारतीय संघात नाहीत. त्यांची जागा आता शिखर धवन, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमीसारख्या युवा खेळाडूंनी घेतली आहे. तर लंकेच्या संघात कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेरथ, नुवान कुलशेखरा अजंथा मेंडीससारखे अनुभवी शिलेदार आहेत.

दोन्ही संघाच्या फॉर्मचा विचार केला, तर मात्र भारताची बाजू भक्कम आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तर श्रीलंकेला साखळी फेरीत इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे

टीम इंडियाच्या या यशात अमित मिश्रा आणि आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीचा आणि विराट कोहलीच्या भक्कम फलंदाजीचा महत्त्वाचा वाटा आहे

पाच सामन्यांमध्ये अश्विनने 10 तर मिश्राने 9 विकेट्स काढल्या,तर विराटने स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये 128.04 च्या स्ट्राईक रेटने 242 धावा केल्या. त्याशिवाय रोहित शर्मानेही सातत्यपूर्ण खेळ करत 171 धावांचा केल्या, फायनलमध्येही या सर्वांची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

फायनलमधला रेकॉर्ड पाहता टीम इंडियाला श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. ट्वेण्टी-20 विश्वचषकात भारताने दुसऱ्यांदा फायनल गाठली, आणि टीम इंडियाच्या खात्यात एक जेतेपद जमा झालं. तर तिसऱ्यांदा फायनल गाठणाऱ्या श्रीलंकेला अजूनही पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा निश्चितच आहे.

2007 पासून वन डे आणि ट्वेण्टी-20च्या मैदानात सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये श्रीलंकेने चारवेळा फायनल गाठली आहे, आणि चारही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. तर भारताने 2007 मध्ये ट्वेण्टी-20 आणि 2011 मध्ये वन डेत विश्वचषक विजय साजरा केला आहे.

एकाच वेळी वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टी-20 अशी आयसीसीची तीन जेतेपदं मिळवण्याची संधी धोनी ब्रिगेड साधणार का, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 11:16


comments powered by Disqus