ललित मोदींचा गेमओव्हर! Lalit Modi banned for life, BCCI takes unanimous decision in SGM

ललित मोदींचा गेमओव्हर!

ललित मोदींचा गेमओव्हर!
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

इंडियन प्रीमियर लीग ही लोकप्रिय टूर्नामेंट सुरु करणारे ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लावण्यात आलेल्या २२ आरोपांपैकी ८ आरोपांमध्ये दोषी आढळल्यामुळं त्यांच्यावर एकमतानं ही बंदी लादण्यात आली आहे. मात्र, मोदी या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगचे जन्मदाते, भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थानं ग्लॅमर प्राप्त करुन देणारे आणि जागतिक क्रिकेटमध्ये एकच खळबळ माजवून देणारे ललित मोदी यांचा अखेर गेम ओव्हर झाला आहे. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी बीसीसीआयनं त्यांच्यावर आजीवन बंदी लादली आहे.

यामुळं आता ललित मोदी भारतीय क्रिकेटमध्ये कोणतही पद भूषवू तर शकत नाहीच याशिवाय कोणत्याही क्रिकेट संघटनेचे ते साधे सदस्यदेखील बनू शकणार नाहीत. २००८मध्ये आयपीएल या ग्लॅमरस टूर्नामेंटची सुरुवात करणारे ललित मोदी हे २००८ ते २०१० पर्यंत आयपीएलचे कमिश्नर होते.

मात्र, २०१०चा आयपीएल सीझन संपताच बीसीसीआयनं त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे एकूण २२ आरोप लावले आणि त्यांना कमिश्नर पदावरून निलंबित केल. त्यांच्या या आरोपांची चौकशी बीसीसीआयच्या तीन सदस्यीय शिस्तपालन समितीकडे सोपवण्यात आली. मात्र एन. श्रीनिवासन हे समितीतून बाहेर पडले आणि अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शिस्तपालन समितीने ४०० पानांचा अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारेच बीसीसीआयनं चेन्नईत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मोदींवर ही बंदी लादण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान बीसीसीआयच्या या विशेष सर्वसाधारण सभेला मोदींनी पतियाळा हाऊस कोर्टातून स्थगिती आदेश मिळवला होता. पण दिल्ली हायकोर्टानं ही स्थगिती उठवल्यामुळं मोदींचे सारेच मार्ग खुंटले. दरम्यान जीवाला धोका असलेले ललित मोदी गेली काही वर्ष लंडनमध्ये वास्तव्याला असून ते आता काय पाऊल उचलतात याकडेच साऱ्यांच लक्ष लागून राहिलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 26, 2013, 08:45


comments powered by Disqus