‘होय, मी दिली होती खोटी साक्ष’, Henry Williams lied to King Commission against Hansie Cronje over India ODI

‘होय, मी दिली होती खोटी साक्ष’

‘होय, मी दिली होती खोटी साक्ष’
www.24taas.com, नवी दिल्ली

मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या माजी दक्षिण आफ्रिकन कॅप्टन हॅन्सी क्रोनिए प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. ‘भारताविरूद्ध नागपूर येथे झालेल्या वन-डे मॅचमध्ये खराब परफॉर्मन्स करण्याकरता कॅप्टन हॅन्सी क्रोनिएने पैसे स्विकारण्याचा कोणताही प्रस्ताव दिला नव्हता... मी त्याच्याविरुद्ध दिलेली साक्ष खोटी होती’ अशी कबुली माजी द. आफ्रिकन फास्ट बॉलर आणि फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या हेन्री विल्यम्सनं दिलीय.

विल्यम्स आणि हर्षेल गिब्ज यांनी मॅच फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या किंग्ज कमिशनसमोर तत्कालिन कॅप्टन क्रोनिएविरूद्ध केस बळकट करण्याकरता खोटी साक्ष दिल्याचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर हेन्री विलियम्स आणि हर्षेल गिब्ज यांच्यावर सहा महिन्यांची बंदी लादण्यात आली होती. तर मॅच फिक्सिंगची कबुली देणाऱ्या क्रोनिएवर आजिवन बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या एका विमान अपघातात क्रोनिएचा मृत्यू झाला होता.

‘नागपूर येथे भारताविरूद्ध खेळलेल्या वन-डे मॅचमध्ये फिक्सिंगकरता क्रोनिएने 15 हजार डॉलरचा प्रस्ताव दिल्याची खोटी साक्ष मी आणि गिब्जने दिली. मी जे सांगतोय ते खरे आहे. मनावरचे ओझे दूर करण्यासाठी सगळं सांगून टाकावंसं वाटलं’ असं हेन्री विल्यम्सनं या मुलाखतीत म्हटलंय.

दरम्यान, किंग कमिशनसमोर फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या फिट्जगेराल्ड आणि पीटर व्हेलन या वकिलांनी विल्यम्सने केलेले आरोप खोडून काढले आहेत.

First Published: Monday, January 14, 2013, 19:25


comments powered by Disqus