मास्टर ब्लास्टरकडून क्रिकटचे धडे, तेही मोफत! , sachin tendulakar animated serial, master blaster

मास्टर ब्लास्टरकडून क्रिकटचे धडे, तेही मोफत!

मास्टर ब्लास्टरकडून क्रिकटचे धडे, तेही मोफत!
www.24taas.com, नवी दिल्ली

तुमच्या चिमुकल्यांना क्रिकेटची आवड आहे... त्यानं एखाद्या उत्तम प्रशिक्षकाकडून खेळाचे धडे घ्यावेत, असं तुम्हालाही वाटत असेल, तर आता तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरकडून प्रशिक्षण देऊ शकाल.

होय हे शक्य झालंय ते ‘मास्टर ब्लास्टर’ या सीरियलमुळे... सचिनने या सीरियलसाठी एक करारही केलाय. क्रिकेटचा बादशाह सचिन येत्या २४ एप्रिलला ४० वर्षांचा होतोय. या चाळीशीनिमित्त, त्यानं देशभरातील तमाम बच्चेकंपनीला आणि त्यांच्या पालकांना ही झक्कास भेट द्यायचं ठरवलंय. एकूण २५ भागांच्या या सीरियलमध्ये सचिन ४ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना क्रिकेटचे धडे देणार आहे. ‘शिमारो’ कंपनी आणि अमेरिकेच्या ‘मूनस्कूप एजन्सी’ने सचिनला या कामासाठी राजी केलंय.

जगात जिथं क्रिकेट नाही तिथपर्यंत या सीरियलच्या माध्यमातून क्रिकेट पोहचू शकेल, असं सचिनला वाटतंय. त्यामुळेच सचिन अगदी मोफत या सीरियलसाठी काम करणार आहे. एकही रुपया मानधन म्हणून न घेण्याचा निर्णय सचिननं घेतलाय. अॅनिमेटेड सीरिजच्या माध्यमातून क्रिकेट प्रशिक्षण, ही अत्यंत अभिनव कल्पना असल्याचं सचिनला वाटतंय. ‘कमी वयोगटातील मुले कच्च्या मडक्याप्रमाणे असतात. म्हणून ते झटपट क्रिकेट शिकू शकतील. यासाठी अॅनिमेशन लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग आहे’ असं त्यानं म्हटलंय. क्रिकेटसोबतच विनम्रपण, मोठ्यांबद्दल आदर, कष्ट आणि टीम वर्कचेही धडे सचिन या चिमुकल्यांना देणार आहे.

‘मास्टर ब्लास्टर’ या अॅनिमेटेड सीरिजसाठी सुमारे ५० ते ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सप्टेंबर २०१४ पर्यंत हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर पाहायला मिळू शकतो.

First Published: Wednesday, April 10, 2013, 09:09


comments powered by Disqus