Last Updated: Wednesday, May 16, 2012, 00:08
www.24taas.com, दिल्ली 
महेला जयवर्धने आणि ओझाच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने आपला विजय साजरा करीत 'दिल्लीचे तख्त राखले'. दिल्लीने पंजाबवर पाच विकेटने दणदणीत विजय मिळविला. या विजयासोबत दिल्लीने आयपीएलच्या 'प्ले ऑफ'मध्येही स्थान निश्चित केले आहे. पंजाबने टॉस जिंकून दिल्लीसमोर १३७ रनचे आव्हान ठेवले होते. ते गाठण्यासाठी दिल्ली संघाची सुरूवातीला चांगलीच दमछाक झाली.
परंतु महेला जयवर्धनेने डाव सावरला. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. तसेच ओझाचे (३४) चांगले योगदान लाभले. दिल्लीचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वीरेन्द्र सहवाग तसंच वेणुगोपाळ राव स्वस्तात बाद झाले. रॉस टेलरला भोपळाही फोडता आला नाही. पण महेला जयवर्धनेनं ४९ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ५६ धावा केल्या आणि दिल्लीला विजय मिळवून दिला.
इरफान पठाणनं १० चेंडूंमध्ये १९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या विजयामुळे दिल्लीच्या खात्यात २० गुण जमा झाले आहेत आणि दिल्लीचा प्लेऑफमधला प्रवेश निश्चित झाला. किंग्ज इलेव्हनच्या खात्यात १४ सामन्यांमध्ये १४ गुण आहेत. प्लेऑफ गाठण्यासाठी पंजाबला आता पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागतील.
First Published: Wednesday, May 16, 2012, 00:08