टेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन - Marathi News 24taas.com

टेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन

विनित डंभारे,  www.24taas.com, मुंबई
 
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला पुन्हा टेस्ट चॅम्पियन बनण्याचे वेध लागले आहेत. भारताच्या दौ-यावर येणा-या इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिज जिंकून, पुन्हा टेस्टमध्ये बेस्ट बनण्याचा मानस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाणा-या टीम इंडियाकडे, टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा एकदा चमकण्याची संधी आहे.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुवर्णकाळ अनुभवलेल्या टीम इंडियाची सध्याची स्थिती फारच वाईट आहे. मेहनतीच्या जोरावर टी-20 वर्ल्ड चॅम्पियन, टेस्ट चॅम्पियनशीप आणि वन-डेचे बादशहा...अशी एकमागे एक बिरूद कमावणा-या टीम इंडियाने दोन परदेशी दौ-यात कमावलेलं सर्व गमावलं. या सर्व पराभवांमध्ये टीम इंडिया आणि फॅन्सना सर्वाधिक दुःख झालं ते टेस्टमधील बादशहात गमावण्याचं... आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय टीम टेस्ट क्रिकेटचे ख-या अर्थाने राजे झाले होते. पण त्यांना मिळालेलं हे यश सांभाळता आलं नाही. भारतीय टीमची झोळी फाटलेल्या भिका-यासारखी अवस्था झाली. एकामागून एक सतत होणारे मानहानीकारक पराभव आणि मायदेशात फॅन्सकडून तसेच क्रिकेट पंडितांकडून होणारी बोचरी टीका यामुळे टीम इंडिया निराशेच्या गर्तेत गेली होती.
 
इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियात विजयाची नोंद करण्याच्या उद्देशाने गेलेल्या टीम इंडियाला तेथेही लाजिरवाण्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं. या सातत्यपूर्ण खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाला टेस्ट रँकिंगमध्ये बसला आणि टेस्ट चॅम्पियन टीम इंडियाची रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली.
 
पण आता टीम इंडियाला गमावलेली पत परत मिळवायची आहे. ही नामी संधी भारताला मायदेशातच चालून आली आहे. यावर्षी न्यूझीलंड आणि इंग्लंडची टीम टेस्ट सीरिज खेळण्याकरता भारताच्या दौ-यावर येणार आहे. त्यामुळे भारतीय टीमला टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा वर जायची संधी आहे. याच संधीचा फायदा उचलण्यासाठी टीम इंडियासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सज्ज झालाय.
 
जेव्हा अनेक वर्ष तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता आणि भरपूर मेहनत करता त्यावेळी क्रिकेटमध्ये तुम्हाला नंबर वन रँकिंग मिळतं. मेहनतीच्या आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये मध्ये टॉप पोझिशनपर्यंत पोहोचलो होतो, त्यानंतर मात्र आमची घसरण झाली .पण आम्हाला तिथे परत पोहोचायचंय...
किवींविरूद्ध भारतीय टीम ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे. तर इंग्लंडविरूद्ध नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान भारतीय टीम चार टेस्टची सीरिज खेळणार आहे. त्यामुळे भारतीय टीमला पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेटचे शेर बनण्याची मिळालेली प्रत्येक संधी सार्थकी लावत. भारताचा झेंडा टेस्ट चॅम्पियनशीपवर मानाने फडकावण्याची संधी आहे आणि पुन्हा टीम इंडियाला टेस्ट चॅम्पियन झालेलं पाहण्याचं भारतीय फॅन्सचं स्वप्न लवकरच साकार होईल अशी आशा सर्वांना वाटतेय.
 

First Published: Saturday, June 2, 2012, 18:54


comments powered by Disqus