Last Updated: Thursday, December 8, 2011, 17:44
झी २४ तास वेब टीम, इंदूरविक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा वन डेतील विश्वविक्रम मोडीत काढल्यामुळे नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवाग जबरदस्त खूष आहे. वीरेद्र सेहवागने इंदूरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध विश्वविक्रमी २१९ धावांची खेळी केली.
या खेळीनंतर बोलताना सेहवाग म्हणाला, सचिनने जेव्हा २०० धावांची खेळी केली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्यावेळी मी पॅव्हॅलियनमध्ये बसून टाळ्या वाजवत होतो आणि सचिनला चिअर करीत होतो. मी सचिनचे अनुकरण केले आणि त्याचा विश्वविक्रम मोडून काढला, या बद्दल मला खूप आनंद होत आहे. सचिन सारख्या महान फलंदाजाचा विक्रम मोडीत काढणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे मत वीरूने व्यक्त केली आहे.
वीरूच्या झंझावाती द्विशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर १५३ धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने वन डे सिरीज ३-१ने खिशात घातली. सेहवागला जबरदस्त खेळीमुळे सामनावीराचा मान देण्यात आला. यावेळी मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाने त्याला १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मला पुन्हा येथे येऊन द्विशतक करायला आवडेल आणि पुन्हा १० लाख रुपये घेण्यास आवडेल, असा मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली.
First Published: Thursday, December 8, 2011, 17:44