सेहवागला २५ लाखांचे बक्षीस! - Marathi News 24taas.com

सेहवागला २५ लाखांचे बक्षीस!

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये २०० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या विक्रम’वीर’ वीरेंद्र सेहवागवर देशभरातून आणि जगभरातल्या क्रिकेट वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, दिल्ली क्रिकेट मंडळानं २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.
 
काल वीरेंद्र सेहवागच्या धडाकेबाज खेळीमुळे मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाने त्याला १० लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मला पुन्हा येथे येऊन द्विशतक करायला आवडेल आणि पुन्हा १० लाख रुपये घेण्यास आवडेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली होती. मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाने सन्मानित केल्यानंतर आज विक्रमवीरूचा घरच्या लोकांनी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून सन्मान केला आहे.
दरम्यान, विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा वन डेतील विश्वविक्रम मोडीत काढल्यामुळे नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवागने  आनंद व्यक्त केला. वीरेद्र सेहवागने इंदूरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध विश्वविक्रमी २१९ धावांची खेळी केली.
या खेळीनंतर बोलताना सेहवाग म्हणाला, सचिनने जेव्हा २०० धावांची खेळी केली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्यावेळी मी पॅव्हॅलियनमध्ये बसून टाळ्या वाजवत होतो आणि सचिनला चिअर करीत होतो. मी सचिनचे अनुकरण केले आणि त्याचा विश्वविक्रम मोडून काढला, या बद्दल मला खूप आनंद होत आहे. सचिन सारख्या महान फलंदाजाचा विक्रम मोडीत काढणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे मत वीरूने व्यक्त केली आहे.
 

First Published: Friday, December 9, 2011, 15:29


comments powered by Disqus