सचिनला नाकारून क्रिकेटवर उपकार केले- लिली - Marathi News 24taas.com

सचिनला नाकारून क्रिकेटवर उपकार केले- लिली

www.24taas.com, चेन्नई
 
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्याने आजवर  सगळ्या गोलंदांजांना सळो की पळो करून सोडलं आहे. हाच सचिन स्वत: गोलंदाज बनण्यासाठी एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये आला असताना, त्याला गोलंदाज होण्याऐवजी फलंदाजीवर लक्ष केंद्रित कर असा सल्ला देऊन प्रवेश देण्यास नकार देण्याचा आपला निर्णय क्रिकेटवर उपकार करणाराच ठरला, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेनिस लिली यांनी व्यक्त केलं आहे.
 
पत्रकारांशी बोलत असताना, त्यांना सचिनशी झालेली पहिली भेट आठवली. त्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी मिश्कील टिप्पणी करत वरील उद्गार काढले. ती घटना कधीच विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतर वर्षभरातच एकदा सचिन फलंदाजी करत असताना, त्याच्या पाठी मी उभा होतो. गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूला त्याने सीमारेषेपलीकडे पाठवले. नंतरच्या प्रत्येक चेंडूला चौकार मारत होता. गोलंदाजांना त्याला चेंडू कुठे टाकावा हेच कळत नव्हते.
 
त्याने १२ चेंडूंत ४८ धावा केल्या. त्यावेळी मी मुख्य कोच टी. ए. शेखर यांना विचारले हा कोण फलंदाजी करतोय. त्यावर शेखर यांनी हसून, तुम्हीच या मुलाला वेगवान गोलंदाज होण्यापासून रोखले होते, असे लक्षात आणून दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणापूर्वीच त्याचा खेळ पाहायला मिळणे ही माझ्यासाठी नशिबाची गोष्ट होती. हा जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू होईल, असे तेव्हाच मनापासून वाटले होते, असेही लिली या वेळी म्हणाले.
 
 
 

First Published: Friday, June 29, 2012, 19:07


comments powered by Disqus