आशिया कपः भारत-पाक सामना टाय - Marathi News 24taas.com

आशिया कपः भारत-पाक सामना टाय

www.24taas.com, क्वालालंपूर
 
अंडर-१९ आशिया कपमधील अत्यंत चुरशीचा अंतीम सामना टाय झाल्याने अशिया कपचे जेतेपद संयुक्तपणे देण्यात आले.
 
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ५० षटकांमध्ये ९ बाद २८२ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघालाही आपल्या निर्धारीत ५० षटकांत आठ बाद २८२ धावाच करता आल्या. त्यामुळे या स्पर्धेच जेतेपद संयुक्तपणे देण्यात आलं.
 
भारताकडून कर्णधार उन्मुक्त चांदने दमदार १२१ धावांची खेळी केली मात्र, झुंझार खेळी करणारा चांद शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाल्याने भारताला विजयासाठी आवश्यक असलेली धाव घेता आली नाही, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
 
हा सामना अखेरच्या बॉलपर्यंत रंगला. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला सात धावांची गरज होती. शतकवीर कर्णधार उन्मुक्त चांद मैदानात असल्याने भारत हे आव्हान पार करेल अशी आशा होती. मात्र चौथ्या बॉलला चांद बाद झाला आणि भारताचं धाबं दणाणलं. यानंतर मग शेवटच्या चेंडूवर एक धावेची गरज होती, मात्र तळाचा फलंदाज रुश कलेरिया बाद झाला आणि सामना टाय झाला.
 
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजी दिली होती. सलामीवीर सामी अस्लमच्या १३४ धावांच्या जोरावर पाकिस्तानने २८२ धावा केल्या. भारताकडून रश कलारियाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

First Published: Sunday, July 1, 2012, 17:57


comments powered by Disqus