Last Updated: Monday, December 12, 2011, 13:58
झी २४ तास वेब टीम, होबार्टरोमहर्षक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर केवळ ७ धावांनी थरारक विजय मिळवत न्यूझीलंडने तब्बल २६ वर्षांनंतर कांगारूंच्या भूमीत कांगारूंनाच धूळ चारण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. डग ब्रेसवेलने ६ विकेट काढून या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.
ऑस्ट्रेलियातील होबार्ट कसोटीच्या चौथ्या दिवशी अवघ्या ७४ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ८ गडी झटपट बाद झाले आणि न्यूझीलंडने ही टेस्ट ७ धावांनी जिंकली. त्यामुळे न्यूझीलंडने या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. १९९३ नंतर प्रथमच न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय मिळवला असून, १९८५ नंतर प्रथमच कांगारूंच्या भूमीत कांगारूंना मात देण्याची किमया न्यूझीलंड संघाने घडवली.
ऑस्ट्रेलियातर्फे डेविड वॉर्नरने नाबाद सेन्चुरी (१२३ धावा) झळकावत एकाकी झुंज दिली. परंतु दुसऱ्या बाजूने एकापाठोपाठ एक गडी बाद झाल्याने त्याची मेहनत वाया गेली. डग ब्रेसवेलने ४० धावांत ६ गडी बाद करून कांगारूंचा खुर्दा केला. त्याने रिकी पाँटिंग (१६), मायकल क्लार्क (०), माइक हसी (०), जेम्स पॅटिन्सन (४), मिशेल स्टार्क (०) आणि लियॉन (९) यांना गुंडाळले.
First Published: Monday, December 12, 2011, 13:58