Last Updated: Wednesday, July 18, 2012, 10:49
www.24taas.com भारत आणि पाकिस्तान वैर असलं तरी आजही एकच धागा आहे जो दोन्ही देशांना जोडतो आणि तो धागा म्हणजे क्रिकेट... क्रिकेटमुळेच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत झाली. कधी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक भारतात आले. तर राहुल आणि प्रियांका गांधी मॅच पाहायला कराचीमध्ये पोहचले.
मुंबई हल्ल्याच्या जखमा भारतीयांच्या मनावर खोलवर रुजलेल्या असताना आता पुन्हा एकदा भारत आणि पाकमध्ये सीरिजची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचेसनी नेहमीच दोन्ही देशातील संबंध सुधारण्याचंच काम केलंय. त्यामुळेच भारत-पाक मॅचेसना क्रिकेटविश्वात ‘मदर ऑफ ऑल क्रिकेटिंग बॅटल’ म्हटलं जातं. मैदानावर मुकाबला २२ क्रिकेटपटूंमध्ये असला तरी, दोन्ही देशांच्या क्रिकेटफॅन्सच्या भावनाही यामध्ये जोडलेल्या असतात. विजय आणि पराभवाचा परिणाम क्रिकेटपटूंवरही लगेच दिसून येतो. दोन्ही देशांतील राजकारण्यांवरही या मॅचेसचा तणाव असतो. त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच क्रिकेटचा वापर करण्यात येतो.
१९८७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट मॅचला तत्कालिन राष्ट्रपती ‘झिया उल हक’ यांनी जयपूरमध्ये उपस्थिती लावली होती. भारताचे त्यावेळचे प्रधानमंत्री राजीव गांधींनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्यावरून तणावाचं वातावरण होतं. दोन्ही देशांचे सैनिकही त्यावेळी हाय अलर्टवर होते. मात्र, भारत-पाक मॅचेसमुळे हा तणाव कमी होण्यास त्यावेळी मदत झाली. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर भारतीय टीम फ्रेंडशिप मॅचेस खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती आणि या सीरिज दरम्यान राजकीय क्षेत्रातील ‘हेवीवेट्स’च्या भेटीगाठीही झाल्या होत्या. सीरिजचा फायदा घेत त्यावेळीळी संबंध सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले.
आता वेळ होती ती पाकिस्तानचे त्यावेळचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांची भारतात येण्याची. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांनी या सीरिजमधील शेवटची मॅच पाहिली होती. आणि या सीरिजमुळेच मैत्रीच्या दिशेनं दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे टाकलं होतं. त्यानंतर २०११ वर्ल्ड कपमध्ये संबंध सुधारण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकपची ‘हाय वोल्टेज’ मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी मोहालीमध्ये आले होते. दोन्ही देशांच्या पंतप्रधांनांनी त्यावेळी स्टेडियमध्ये भेट घेतली आणि दोन्ही देशातील मैत्रीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा क्रिकेटमुळे दोन्ही देशातील बिघडलेले संबंध पुन्हा सुधारले जातील, अशी अपेक्षा केली जात असली तरी कसाब आणि मुंबई हल्ल्यातला पाकचा सहभाग या बाबी दुर्लक्षून ही सीरिज होणं योग्य की अयोग्य? हा प्रश्न मात्र आता चर्चेचं वादळ घडवणारा ठरणारा ठरतोय.
.
First Published: Wednesday, July 18, 2012, 10:49