Last Updated: Wednesday, July 18, 2012, 13:32
www.24taas.com, लाहोर डिसेंबरमध्ये आयोजित केलेली भारत-पाकिस्तान मॅच सीरिज अगोदरच वादात अडकलीय, त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे ती मैदानाबाहेरच्या काही मुद्यांमुळे... कारण, या मॅचदरम्यान मिळणाऱ्या उत्पन्नात हिस्सा मिळावा, अशी मागणी आता पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलीय.
पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पन्नात हिस्सा मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव पाकिस्तान बोर्ड लवकरच बीसीआयसमोर मांडणार आहे. उभयतांमध्ये या मॅच सीरिजसंदर्भातल्या इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी हा प्रस्ताव बीसीसीआयसमोर मांडण्याचं पीसीबीनं ठरवलंय.
बीसीसीआयनं अधिकृतरित्या पाकिस्तानला क्रिकेटच्या मॅचेससाठी आमंत्रण धाडलंय. डिसेंबरमध्ये भारत-पाक दरम्यान तीन वन डे तसंच दोन टी-२० मॅचेसचं आयोजन करण्याचा मानस बीसीसीआयनं व्यक्त केलाय. पण, या मॅचेसची तारिख आणि ठिकाणं मात्र दोन्ही देशांकडून अजून निश्चित झालेली नाहीत. २००७च्या पाकिस्तानच्या भारत दौऱ्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाक क्रिकेट टीम्स आमने सामने येणार आहेत. ‘भारतानं पाकिस्तानला आमंत्रित केलंय ही सकारात्मकच बाब आहे. पण, बीसीसीआयनं उत्पन्नातील हिस्सा देण्यास नकार दिल्यास आम्हाला या सीरिजमधून काहीही आर्थिक फायदा मिळणार नाही’ असं पीसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या मॅचेस पाकिस्तानत खेळल्या जाव्यात की भारतात याबद्दलही अजून काही निश्चित बोलणी झालेली नाहीत. तिऱ्हाईत जागेवर मॅच खेळण्यासही दोन्ही बाजूंनी नकार मिळालाय.
'या अगोदरही नियोजित दौरा रद्द केल्याची भरपाई अजूनही भारतानं दिलेली नाही,' असंही पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केलंय. २००९ झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर भारतानं नियोजित पाकिस्तान दौरा रद्द केला होता. त्यानंतर तिऱ्हाईत जागेवर खेळण्यासही भारतानं नकार दिला होता. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागल्याचं पीसीबीचं म्हणणं आहे.
भारतानं या मॅचमधून मिळणाऱ्या उत्पन्नात हिस्सा द्यावा किंवा तिऱ्हाईत ठिकाणी खेळायचं असल्यास तसा लेखी करार करावा, असं पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी स्पष्ट केलंय. २००९ नंतर पाकिस्तानच्या मैदानावर कोणतीही इंटरनॅशनल मॅच झाली नसल्यानं पीसीबीला आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचं अश्रफ यांनी स्पष्ट केलंय.
First Published: Wednesday, July 18, 2012, 13:32