Last Updated: Wednesday, July 18, 2012, 20:12
www.24taas.com, मुंबई
कसोटी क्रिकेटचे समालोचक सुरेश सरैया याचे आज राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
१९६५ सालापासून प्रथमश्रेणी आणि १९६९ सालापासून क्रिकेटचे धावते समालोचन करणार्या सरैयांनी शंभरावर कसोटी सामन्यांत समालोचन केले आहे.
सरैया घराणे तसे नवसारीचे. परंतु वडील ‘स्टेशन मास्तर’ असल्यामुळे त्यांचे बालपण माटुंग्याच्या मध्यमवर्गीय वस्तीत गेले. पाचवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत तर ५वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण अंधेरीच्या शेठ माधवदास अमरसी हायस्कूलमध्ये झाले.
गिरगाव चौपाटी येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र घेऊन कला शाखेची पदवी, सिद्धार्थ महाविद्यालयात एल.एल.बी.चे शिक्षण अर्धवट सोडून देणार्या सरैयांनी भवन्स महाविद्यालयातून ‘जनसंपर्क आणि प्रसिद्धी’ तसेच पत्रकारितेचा डिप्लोमाही पूर्ण केला.
१९६९ पासून कसोटी समालोचन करणार्या सरैयांना तेव्हा विजय मर्चंट, देवराज पुरी, डिकी रत्नागरसारख्या दिग्गजांसमोर उभे ठाकावे लागली. ४ नोव्हेंबर १९६९ रोजी त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हिंदुस्थान या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या कसोटीत ‘रनिंग कॉमेण्ट्री’च्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता बिल लॉरी तर हिंदुस्थानचा मन्सूर अली खान पतौडी. त्यानंतर त्यांनी द. आफ्रिकेत केपटाऊन येथील चौथ्या कसोटीत ‘धावत्या समालोचना’ची पन्नाशी गाठली. त्यावेळी हर्षा भोगले त्यांचे सहकारी होते. त्यानंतर गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला २०११ रोजी नागपूर येथे हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्याविरुद्ध सामन्यात समालोचन करून ‘रनिंग कॉमेण्ट्री’ची सेंच्युरी ठोकली.
First Published: Wednesday, July 18, 2012, 20:12