Last Updated: Thursday, October 6, 2011, 12:10
झी 24 तास वेब टीम, मुंबई. सचिनवर टीका करणाऱ्या शाहिदन आफ्रिदीने नेहमीप्रमाणे कोलांटउडी मारली आहे. शाहिदनं यापूर्वी आपण सचिनला शोएब अख्तरच्या बॉलिंगवर खेळतांना त्याचे पाय लटपटतांना पाहिलं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सचिनवर केलेल्या टीकेनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून टीकेचा भडीमार झाल्याने आफ्रिदीला पुन्हा सचिनविषयी आदर निर्माण झाला आहे.
शोएब अख्तरनं त्यांच्या आत्मचरित्रात सचिन आपल्या बॉलिंगला घाबरायचा असं म्हटलं होतं. शोएबच्या या लिखाणावर क्रिकेट जगतात वादंग निर्माण झालं. शोएब अख्तरनं हे लिखाण पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी केल्याचं अनेकांनी म्हटलं होतं.
शोएब अख्तरच्या लिखाणाला पाकचाच क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं दुजारो दिला होता. आपण सचिनला शोएबच्या बॉलिंगवर लटपटतांना पाहिलं असल्याचं म्हटलं होतं. यावर भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीनं शाहिदचं डोकं ठिकाणावर नसल्याचं कडक शब्दात उत्तर दिलं होतं.
सचिनवरील वादग्रस्त विधानानंतर टीकेच्या धनी झालेल्या शाहिदने आज पुन्हा एक नवीन वक्तव्य केलंय. आपण सचिनबद्दल फक्त एका सामन्याबद्दल बोललो होतो. सचिनविषयी आपल्या मनात अत्यंत आदर असल्याचं शाहिद आफ्रिदीनं म्हटलंय.
First Published: Thursday, October 6, 2011, 12:10