LIVE - ऑस्ट्रेलियाची खराब सुरूवात - Marathi News 24taas.com

LIVE - ऑस्ट्रेलियाची खराब सुरूवात

24taas.com, सिडनी
 
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे,  हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडिया १९१ रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावल्या. केवळ २९ रन्स केल्या आहेत.
 
पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे सिडनी येथे आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करीत टीम इंडियाचा डाव अवघ्या १९१ धावांत गुंडाळला.  कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद अर्धशतक (५७ )  केले.
 
सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा युवा जलदगती गोलंदाजा जेम्स पॅटिन्सन याने गौतम गंभीरला क्लार्ककरवी झेलबाद करीत भारतीय कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरविला. गंभीर पहिल्या सामन्यातही प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता. यावेळी तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर द्रविडही पिटर सिडलच्या गोलंदाजीवर कोवानच्या हाती झेल देऊन ५ धावांवर बाद झाला.
 
वीरेंद्र सेहवाग मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असताना पॅटिन्सनने त्याला यष्टीरक्षक हॅडीनकडे झेल देण्यास भाग पाडून ३० धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेला व्हीव्हीएस लक्ष्मणही निष्प्रभ ठरला. त्यालाही पॅटिन्सनने २ धावांवर बाद केले. विराट कोहली सिडलच्या गोलंदाजीवर २३ धावांवर बाद झाल्यानेटीम इंडियाला पाचवा झटका बसला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका बाजूने चांगली खेळी करीत होता. मात्र, तो ४१ धावांवर बाद झाल्याने त्याची शतकांचे शतक करण्याची संधी पुन्हा एकदा हुकली.
 
सचिन बाद झाल्यानंतर अश्विनने धोनीच्या साथीने भारताच्या धावांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली. त्याने धोनीबरोबर सातव्य विकेटसाठी अर्धशतकी (५४ ) भागिदारी करीत भारताची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. मात्र हिल्फेनहॉसने त्याला २० धावांवर बाद करीत भारताला सातवा झटका दिला. त्यापाठोपाठ झहीर खान लगेच दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर चहापानापर्यंत भारताची ८ बाद १७८ अशी अवस्था झाली. चहापानानंतर भारताचे उरलेले फलंदाज १३ धावा जोडू शकले आणि भारताचा डाव १९१ धावांत संपुष्टात आला.
 
लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरसाठी हे मैदान मोठ्या धावांचे ठरले आहे. मात्र, लक्ष्मणने निराशा केली. माझे सर्वांत लाडके मैदान, अशा शब्दात सचिन सिडनी मैदानाचे वर्णन करतो. मला येथे पाऊल ठेवल्यावर घरच्या मैदानाचा फिल येतो, असे सचिन सांगतो. त्यामुळे सचिनच्या खेळाकडे लक्ष लागले होते. पुन्हा सचिनने निराशा केली.
ऑस्ट्रेलियाकडून जेम्स पॅटिन्सनने ४, पिटर सिडल आणि बेन हिल्फेनहॉस यांनी प्रत्येकी ३ बळी मिळविले.
 
 

First Published: Tuesday, January 3, 2012, 11:41


comments powered by Disqus