३९ वर्षाची भक्कम 'द वॉल' - Marathi News 24taas.com

३९ वर्षाची भक्कम 'द वॉल'

 www.24taas.com
 
टीम इंडियाचा आधारस्तंभ राहुल द्रविड आज ३९ वर्षांचा झाला आहे. वयाच्या २२ व्या वर्षी टीम इंडियात प्रवेश केलेला द्रविड गेली १५ वर्ष भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
 
टीम इंडियाचा 'द वॉल' असं ज्याच वर्णन केल जातं तो राहुल द्रविड आज वयाची ३९ वर्ष पूर्ण करत आहेत. ११ जानेवारी १९७३ मध्ये मध्य प्रदेशमधील इंदूर इथं एका महाराष्ट्रीय कुटुंबात या प्रतिभावान क्रिकेटपटूचा जन्म झाला. मात्र द्रविड कुटुंब कर्नाटकला वास्तव्याला असल्याने त्याचं शालेय शिक्षण बंगळुरूमधील सेंट जोसेफ बॉईस या शाळेत तर कॉलेज सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून झालं. शरद आणि पुष्पा या द्रविड दाम्पंत्याचा हा मुलगा अभ्यासात हुशार आणि सिनसिअर होता. याशिवाय त्याला क्रिकेटचीही तेवढीच आवड होती. राहुलने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
 
शालेय क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या राहुलला ३ एप्रिल १९९६ मध्ये प्रथम टीम इंडियासाठी दरवाजे उघडले. यानंतर त्याच वर्षी जूनमध्ये त्याची प्रथमच टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली. यानंतर गेली जवळपास १५ वर्ष द्रविड टीम इंडियाचा एक भक्कम अविभाज्य घटक बनला आहे. त्याने अनेकदा टीम इंडिया संकटात असताना विकेटवर टिच्चून भारताची लाज राखली आहे. त्याच्या या चिकाटी आणि मेहनतीमुळेच त्याला 'द वॉल' ही बिरुदावली चिकटली.
 
द्रविडने आतापर्यंत १६२ टेस्टमध्ये ५२.८२ च्या सरासरीने १३ हजार अधिक रन्स केल्या आहेत. यामध्ये ३६ सेंच्युरी आणि ६३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर ३४४ वन-डेमध्ये त्याने ३९.१६ च्या सरासरीने १० हजार ८८९ रन्स केल्या आहेत. यामध्ये १२ सेंच्युरी आणि ८३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. द्रविडची बॅटिंगची शैली ही जगातिल सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. तंत्रशुद्धता हा त्याच्या बॅटिंगचा आत्मा आहे. याशिवाय मैदानावर आणि मैदानाबाहेरील त्याची वागणूक ही कोणाही क्रिकेटपटूसाठी एक आदर्श आहे.  वयाच्या ३९ वर्षीही राहुल द्रविडमधील क्रिकेट अजूनही संपलेल नाही आणि तो अजूनही भारतीय क्रिकेटची सेवा करतो आहे.

First Published: Wednesday, January 11, 2012, 17:19


comments powered by Disqus