Last Updated: Thursday, October 27, 2011, 05:06
झी २४ तास वेब टीम, दुबई इंग्लंडविरुद्ध ५-० अशी वनडे मालिका निर्विवाद वर्चस्वासह जिंकल्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर गेली आहे.

इंग्लंड-इंडिया ही मालिका सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी ब्रिगेड ११२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर होती, परंतु मालिकेतील विजयानंतर त्यांचे ११८ गुण होऊन धोनी ब्रिगेडने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
ऍलिस्टर कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाची घसरण होऊन ते चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर गेले आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वी ते ११२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होते. सध्या त्यांच्या खात्यात १०६ गुण आहेत. आता दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा सामना जिंकला, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर जाईल.
या सामन्यातील विजयामुळे हशीम आमलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ १२० गुणांसह दुसऱ्या स्थानावर जाईल; परंतु जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ११५ गुणांसह चौथ्याच स्थानावर राहील.
First Published: Thursday, October 27, 2011, 05:06