Last Updated: Saturday, February 4, 2012, 11:15
www.24taas.com, नवी दिल्ली टीम इंडियाचे प्रायोजकत्व मागे घेतानाच, आयपीएलमधील पुणे वॉरियर या संघाची मालकी सोडण्याची घोषणाही सहारा उद्योगसमूहाने केली आहे. त्यामुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या टीम इंडियावर 'बेसहारा' होण्याची वेळ आली आहे.
इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या आवृत्तीसाठी युवराज सिंगच्या ऐवजी दुसरा खेळाडू मिळावा, ही मागणी सहाराने केली होती. ही मागणी फेटाळून लावल्याने कंपनीने तडकाफडकी हे पाऊल उचललं आहे. बीसीसीआय अंतर्गत होणा-या सर्व क्रिकेट सामन्यांपासून आपण संबंध तोडत असल्याची घोषणा सहाराच्या वतीने करण्यात आली.
पुणे वॉरियर या संघाची मालकी तात्काळ अन्य इच्छुक कंपनीकडे सोपवावी, अशी विनंती सहाराने बीसीसीआयकडे केली आहे. सहाराचे टीम इंडियाशी झालेले मूळ कंत्राट २०१०मध्येच संपले आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर सहाराचा लोगो झळकवण्यासाठी भारतीय संघाला कंपनीकडून ३ कोटी ३४ लाख रुपये दिले जात होते.
First Published: Saturday, February 4, 2012, 11:15