सचिन साधणार का शतकांच 'शतक'? - Marathi News 24taas.com

सचिन साधणार का शतकांच 'शतक'?

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
सचिनच्या महासेंच्युरीची प्रतीक्षा आता तरी संपेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. वेस्टइंडिजविरूद्धच्या सीरिजमध्ये सचिनला आपली शंभरावी सेंच्युरी झळकावण्याची संधी आहे. तब्बल 7 महिन्यांनंतर सचिन ही संधी साधून आपली शंभरावी सेंच्युरी झळकावून इतिहास घडवतो का याकडेच आता क्रिकेट फॅन्सच लक्ष लागून राहिलं आहे.
 
जगभरातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या लाडक्या सचिनला हा प्रश्न विचारत आहे. खरतर सचिनच्या शंभराव्या सेंच्युरीची प्रतीक्षा जगभरातील क्रिकेटप्रेमी गेली सात महिने करत आहेत. सचिन ही ऐतिहासिक सेंच्युरी झळकावेल आणि आपण त्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ अशी जगातील प्रत्येक क्रिकेट फॅन्सची इच्छा आहे. खरतर सचिनने यावेळी क्रिकेट फॅन्सची ही प्रतीक्षा जरा जास्तच लांबवली. सचिनने यापूर्वी वर्ल्ड कर दरम्यान आपली अखेरची सेंच्युरी झळकावली होती. 12 मार्च 2011 रोजी नागपूर इथं दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या मॅचमध्ये सचिनने 111 रन्सची खेळी केली होती. यानंतर सचिनला सेंच्युरी झळकावण्याची संधी मिळाली नाही. विश्रांतीमुळे वेस्टइंडिज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय सचिनने घेतला. यानंतर इंग्लंड दौऱ्यावर तिसऱ्या टेस्टमध्ये सचिन नर्व्हस नाइन्टीजचा शिकार झाला आणि इतिहास घडता घडता राहिला.
 
याच दौऱ्यावर तो दुखापतग्रस्त होऊन भारतात परतला यामुळे त्याला भारतात झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या सीरिजलाही मुकाव लागलं. आता सचिनने वेस्टइंडिज विरूद्ध होणा्ऱ्या तीन टेस्टच्या सीरिजसाठी टीममध्ये पुन्हा कमबॅक केलं. आता सीरिज घरच्या मैदानावर आहे समोर तुलनेने कमी ताकदवान अशी वेस्टइंडिज टीम आहे. यामुळे सचिनची ऐतिहासिक सेंच्युरी या सीरिजमध्ये नक्की पहायला मिळेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. सचिन आपल्या चाहत्यांना आता तरी निराश करणार नाही अशी अपेक्षा आहे.

First Published: Friday, November 4, 2011, 14:26


comments powered by Disqus