सचिनच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटींग - Marathi News 24taas.com

सचिनच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटींग

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
साऱ्या क्रिकेट विश्वाची नजर लागून राहिलेल्या सचिन तेंडुलकरच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटिंग करावी लागणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सचिन तेंडुलकर अवघ्या ७ धावांवर बाद झाल्यामुळे अनेक क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे.
भारतीय गोलंदाजांच्या फिरकी माऱ्यासमोर पाहुण्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३०४ धावांवर आटोपल्यानंतर भारताच्या सलामी जोडीने चांगली सुरूवात करत पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. परंतु, गौतम गंभीर एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने ४१ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यात ७ चौकारांचा समावेश आहे.
 
त्यानंतर धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ करत ४६ चेंडूत ९ चौकारांसह अर्धशतक साजरं केलं. परंतु, देवेंद्र बिशूच्या चेंडूवर त्याला बॉगने यष्टीचित केलं. त्याने ५५ धावा केल्या.
 
त्यानंतर महाशतकाच्या तयारी असलेल्या सचिन तेंडुलकरला आज सूर गवसला नाही. त्याने १८ चेंडूंचा सामना करत १ खणखणीत चौकार लगावला आणि ७ धावा केल्या. मात्र, नशीबाने त्याची साथ दिली नाही, त्याला फिलाल एडवर्सने पायचित केले.
 
त्यानंतर व्ही.व्ही.एस लक्ष्मणही फार काळ टिकला नाही. तो १ धावेवर विकेटकीपरकेडडे झेल देऊन बाद झाला.
यापूर्वी कालच्या ५ बाद २५६ धावांवरुन दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या विंडीजची सुरुवात अडखळत झाली.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच प्रग्यान ओझाने बॉला माघारी धाडत सहावा धक्का दिला. लागोपाठ डॅरेन सॅमीलाही माघारी धाडत त्याने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच बळी घेण्याची सर्वोत्तम कामगिरी साकारली.
ईशांत शर्मानेही नांगर टाकून राहिलेल्या चंदरपॉलला माघारी धाडत विंडीजला आठवा धक्का दिला. मग आश्विनने आणि ओझाने तळाच्या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत विंडिजचा डाव ३०४ धावांत गुंडाळला.
ओझाने ३४ षटकांत ७२ धावांच्या मोबदल्यात ६ बळींची कमाई केली. आर. आश्विनने तीन तर ईशांतने एक बळी मिळवला.

First Published: Tuesday, November 8, 2011, 12:24


comments powered by Disqus