Last Updated: Friday, March 16, 2012, 18:46
www.24taas.com, मुंबई
सचिन तेंडुलकरने मिरपूरच्या मैदानावर शंभरावे शतक झळकावत नवा इतिहास घडवला. जगभरातील सचिनचे चाहते ज्या क्षणांची गेली वर्षभर प्रतिक्षा करत होते तो प्रत्यक्षात अवतरला. सचिनच्या शंभर शतकांमधील सर्वोत्कृष्ट शतकं निवडणं म्हणजे अलिबाबाच्या खजिन्यातील रत्नभांडारातील मूल्यवान रत्नं शोधण्याचा प्रयत्न करणं. सचिनच्या सर्व शतकी खेळी सरस आहेतच पण तरीही त्यातील काही संस्मरणीय शतकांचा हा आढावा. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थच्या मैदानावर १९९२ साली ११४ धावांची शतकी खेळी भारतीय संघाची पडझड होत असताना सचिनने खेळपट्टीवर ११४ धावांची धीरोदात्त खेळी केली. एकीकडे भारतीय फलंदाज बाद होत असताना सचिनने न डगमगता खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमणाला तोंड देत शतक झळकावलं त्यामुळे अनेक जण त्याचे चाहते झाले आणि त्यात ऑल टाईम ग्रेट सर डॉन ब्रॅडमन यांचाही समावेश होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९७ साली केप टाऊनच्या मैदानावरची १६९ धावांची शतकी खेळी. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५२९ धावांचे मोठं आव्हान भारतासमोर ठेवलं आणि भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भारताची अवस्था पाच बाद ५८ अशी बिकट झाली. यावेळेस सचिन तेंडलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोख उत्तर देण्याचा निर्धार केला. ऍलन डोनाल्ड, ब्रायन मॅकमिलन आणि शॉन पॉलक अशा तोफखान्याची तमा न बाळगता या दोघांनी तडाखेबंद खेळ केला. अझरुद्दीन आणि तेंडुलकर यांनी दोन सत्रात २२२ धावांची खेळी उभारली. भारताने सामना आणि मालिका जरी गमावली तरी सचिनच्या शतकाची सर्वत्र चर्चा होती.ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई इथे १९९८ साली झळकावलेलं शतक. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९९८ सालची बॉर्डर-गावस्कर मालिका ही सचिन-वॉर्न यांच्यातील चकमकीसाठी ओळखली जाते. सचिनने तोवर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असा नावलौकिक प्राप्त केला होता. तर वॉर्नने सामना जिंकून देणारा लेग स्पिनर आपल्या कारकिर्दीचे शिखर गाठले होते. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात वॉर्नच्या गोलंदाजीवर सचिन स्वस्तात बाद झाला. पण दुसऱ्या डावात सचिनने त्याची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. सचिनच्या १५५ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारताने सामना तर जिंकलाच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वॉर्न परत भारतासाठी धोकादायक ठरु शकणार नाही हे पक्क केलं. शारजात १९९८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेली १३४ धावांची शतकी खेळी शारजात तीन देशांच्या सिरीजच्या साखळी सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फटकावलेल्या १४३ धावांच्या शतकी खेळीने भारते अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सचिनने आणखी एक शतक झळकावत सामना आणि विजेतेपदावर भारताचं नावं कोरलं. सचिनने आपल्या २५ व्या वाढदिवशी केलेले शतक हे क्लासिक याच सदरात गणलं जातं. ऑस्ट्रेलियाने केलेल्या २७२ रन्सचा पाठलाग सचिनच्या शतकामुळे भारताने सहज पार केल . सचिनचा प्रत्येक फटका खणखणीत असाच होता. पाकिस्तान विरुद्ध चेन्नईला १९९९ साली फटकावलेल्या १३६ धावा अनेक जणांच्या मते सचिनची ही आजवरची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. पाकिस्तानच्या २७१ धावांचा पाठलाग करताना भारताची नेहमीप्रमाणेच वाताहात झाली. त्यातच सचिनला पाठदुखीने त्रस्त केलं होतं. चेपॉकच्या खेळपट्टीवर समोर सकलेन मुश्ताकाच्या गोलंदाजीला तोंड देत सचिनने सहा तास बॅटिंग करत आपला क्लास दाखवून दिला. सचिन १३६ धावांवर बाद झाला तेंव्हा भारताला विजयासाठी फक्त २० धावा हव्या होत्या आणि चार विकेटस हातात होत्या. पण दुर्दैवाने भारताचा डाव नंतर फक्त १२ धावात आटोपला. केनिया विरुद्ध ब्रिस्टॉल इथे १९९९ साली केलेली १४० धावांची शतकी खेळी वर्ल्डकपमध्ये केनिया सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध केलेल्या सचिनच्या शतकी खेळीला वेगळं मोल आहे. सचिनच्या वडिलांचे पाच दिवस अगोदरच निधन झालं होतं आणि त्याला अंत्यासंस्कारांसाठी परतावं लागलं होतं. पण भारताच्या दृष्टीने स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी सामना जिंकणं आवश्यक होतं. सचिनने केवळ भारताला विजयच मिळवून दिला असं नाही तर व्यवसायिकतेचा पाठ जगातील सर्व खेळाडूंसमोर घालून दिला. संयत आणि भावनांचे प्रदर्शन न करणारा सचिन देखील या शतकी खेळीनंतर वडिलांच्या आठवणींनी भावविवश झाला होता. सचिनने हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केलं.
सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्दची ११७ धावांची शतकी खेळी सचिनच्या कारकिर्दीची बाबतीत तो मॅचविनर बॅटसमन नसल्याचा ठपका ठेवण्यात येतो. सचिन संघाला विजयी पथावर नेतो पण अखेरपर्यंत खेळत जिंकून देऊ शकत नाही असं त्याच्या टीकाकारांचे म्हणणं असतं. पण सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सचिनने वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग यशस्वीपणे करत संघाला विजय मिळवून दिला. सचिनने बेस्ट ऑफ थ्री सिरीजमधला पहिला सामना भारताला जिंकून दिला. परदेशात दुर्मिळ असलेला मालिका विजय सचिनच्या शतकी खेळीमुळेच शक्य झाला. इंग्लंड विरुध्द २००८ सालची १०३ धावांची शतकी खेळी इंग्लंडच्या ३८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सचिनने केलेल्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना सहजगत्या खिशात टाकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय सामन्यात एकहाती सामना जिंकून देऊ शकतो असं चोख उत्तर टीकाकारांना देणाऱ्या सचिनने त्याचीच पुनरावृत्ती कसोटीतही करुन दाखवली. पाकिस्तानविरुद्ध १९९९ सालच्या कसोटी सामन्यातील पराभवाच्या कटु आठवणीही त्यामुळे पुसल्या गेल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध हैदराबाद इथे २००९ सालची १७५ धावांची शतकी खेळी सचिनने त्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात एक दिवसीय मालिकेत १४,४,३२ आणि ४० रन्स काढू शकला होता. मालिकेतील पाचव्या वनडेत २-२ अशी बरोबरी असताना ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये ३५० धावांचा डोंगर उभारला. सचिनने त्याला चोख उत्तर देताना १४१ चेंडूत १७५ धावा तडकावल्या. भारताला विजयाकडे नेत असताना पदार्पण करणाऱ्या क्लिंट मॅककेच्या गोलंदाजीवर सचिन आऊट झाला. भारताला चार विकेट हातात असताना १८ चेंडुत १९ धावा करायच्या होत्या. पण भारताची तळाची फळी कोसळली आणि तीन धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१० साली २०० धावांची शतकी खेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या तीन सामन्यांच्या वनडेत मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिनने नाबाद २०० धावांची खेळी उभारली. सचिन वनडेच्या इतिहासात द्विशतकी खेळी झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. या शतकी खेळीमुळे वनडेत ४६ आणि कसोटीसह ९३ शतकांचा टप्पा त्याने गाठला. सईद अन्वरचा भारताविरुद्धचा १९४ रन्स आणि चार्ल्स कोवेंट्रीचा बांग्लादेशविरुद्धच्या १९४ धावांचा विक्रम सचिनने मोडीत काढला. दक्षिण आफ्रिकेविरुध्द २०१०-११ साली १४६ धावांची शतकी खेळी सचिनने पहिल्या डावात १४६ रन्सची आणि दुसऱ्या डावात ९१ चेंडूत १४ धावांची खेळीने भारताना सामना अनिर्णित राखता आला. २०१०-११ साली ही सर्वोत्कृष्ट कसोटी खेळी असल्याचं जाणकारांचे मत आहे. सचिनने कसोटीच्या अखेरच्या दिवशी १४६ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकत १४ धावा काढल्या आणि भारताला पराभवापासून वाचवलं.
First Published: Friday, March 16, 2012, 18:46