Last Updated: Thursday, March 22, 2012, 16:14
www.24taas.com, मुंबई आजवर अनेकविध अविश्वनिय वाटणारे स्टंट मिकी माऊसने करुन दाखवले आहेत. पण आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर मिकीने कधी कामगिरी करुन दाखवली नव्हती. आता मात्र मिकी लवकरच क्रिकेट विश्वातही भरारी मारण्यास सज्ज झाला आहे.
मुकेश अंबानींच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सने वॉल्ट डिस्नेसोबत ब्रँडिग करार केला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड असलेला मिकी माऊस त्यामुळे पहिल्यांदाच क्रिकेटशी जोडला जाणार आहे. मागच्या वर्षी उपविजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ मिकीच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. शाळेच्या बॅग ते क्रिकेट बॅट अशा अनेकविध वस्तुंवर मिकी माऊसच्या इमेजचा वापर करण्यात येणार आहे.
रिलायन्सच्या देशभरातील ५००० आऊटलेट्समधून तसंच ओनलाईनवर याचं मार्केटिंग करण्यात येणार आहे. ऍपरल म्हणजेच तयार कपड्यांसाठी ऑनलाईन स्ट्रॅटजीचा वापर प्रामुख्याने करण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सच्या फेसबुकचा फॅनबेस तब्बल २.८ दशलक्ष इतका आहे आणि त्यात अधिकांश हा १३-३५ वयोगटातील आहे. रिलायन्स या फेसबुकला डोळ्यासमोर ठेवून मिकी माऊस ब्रँड उत्पादनांची विक्री आणि मुंबई इंडियन्स संघाची लोकप्रियता दोन्ही वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.
वॉल्ट डिस्नेलाही भारतीयांचे क्रिकेट प्रेम आणि बलाढ्य रिलायन्स उद्योगसमुहाची ताकद माहिती आहे त्यामुळे दोघांसाठी हा सौदा लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, March 22, 2012, 16:14