Last Updated: Friday, March 23, 2012, 18:25
www.24taas.com, मुंबईनिवृत्तीचा सल्ला देणाऱ्या टीकाकारांना सचिन तेंडुलकरने आज पहिल्यांना बॅटने नाही तर तोंडाने प्रत्युत्तर दिले आहे. ' जे मला निवृत्तीचा सल्ला देतात , त्यांनी मला क्रिकेट शिकविलेले नाही. जेव्हा मला मैदानावर उतरल्यानंतर क्रिकेट खेळण्यात उत्साह वाटणार नाही , तेव्हा मी क्रिकेट सोडणार त्यामुळे टीकाकारांनी मला सल्ला देऊ नये, अशी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे.
राष्ट्रगीताची धून वाजत असताना जेव्हा मी सहकाऱ्यांसह मैदानात उभा असतो तेव्हा अभिमान वाटतो . बॅट घेऊन मैदानात उतरतो तेव्हा पूर्वीचाच उत्साह कायम असतो ,' असे सचिनने एका मॅगझीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे.
टीकाकार मला प्रश्न विचारू शकतात, पण त्यांच्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. मला काय वाटते, माझ्या भावना काय आहेत हे ते जाणत नाहीत, असाही टोला सचिनने हाणला आहे.
शंभरावे शतक झळकाविताना आलेल्या अडचणी खूप त्रासदायक होत्या का, यावर सचिन याने होकार दिला. १००वे शतक लगावणे खूपच कठीण गेले. असे का झाले याचे मी शोध घेत आहे. पण हे झाले मी मान्य करतो. कदाचित माझ्या चाहत्यांकडून अपेक्षा वाढल्या होत्या किंवा या शतकासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेपासून मी लक्ष दुसरीकडे वळवू शकलो नाही. माझ्या आत कुठेतरी याचा विपरित परिणाम होत होता. देवही माझी परीक्षा पाहात असावा, अशीही त्याने स्पष्ट कबुली दिली आहे.
गेल्या वर्षी भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर निवृत्तीचा विचार मनाला शिवून गेला का , या प्रश्नावर सचिन म्हणाला , ' असा विचार केव्हाही माझ्या मनाला शिवला नाही . माझ्या अनेक मित्रांनीही मला विचारले की, वर्ल्डकप जिंकल्यानंतर तू निवृत्त का होत नाहीस ? त्यांचे म्हणणे कदाचित योग्यही असावे.
खरोखरच , तेव्हा निवृत्ती घेतली असती तर त्याला वेगळे महत्त्व आले असते , ती वेळही योग्य ठरली असती . पण माझ्या मनात असा विचार आलाच नाही . शिवाय , वर्ल्डकप जिंकल्यानंतर मी निवृत्ती घेतली असती तर भारताच्या ऐतिहासिक विजयापेक्षा सारे लक्ष माझ्या निवृत्तीकडे वळले असते . कारण त्यावेळी केवळ विचार हवा होता तो भारताचा आणि फक्त भारताचा . ती वेळ स्वार्थ जपण्याची नव्हती .'
First Published: Friday, March 23, 2012, 18:25