धोनीच्या चेन्नईला सेहवागचा दणका - Marathi News 24taas.com

धोनीच्या चेन्नईला सेहवागचा दणका

www.24taas.comनवी दिल्ली
 
केव्हिन पीटरसन आणि वीरेंद्र सेहवाग यांची तुफान फटकेबाजी चेन्नई सुपर किंग्जला आसमान दाखविले. आयपीएलचा बादशा म्हणून ओळखणारा  चेन्नई सुपर किंग्ज संघ वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर दुबला दिसला. प्रथम फलंदाजी करताना खेळाडूंनी नांगी टाकली. दिल्ली डेअरडेव्हिल्स चेन्नई सुपर किंग्जला आठ विकेट्सनी पराभवाचा दणका दिला. चेन्नईचे १११ धावांचे आव्हान दिल्लीने दोन विकेट्स गमावून अवघ्या १३.२ षटकांत पार केले.
 
 
चेन्नईचे ११० रन्सचे आव्हान पेलताना नमन ओझाने पहिल्याच षटकांत सलग तीन चौकार लगावून दिल्लीला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर सेहवागने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत २१ चेंडूंत चार चौकार आणि एक षटकारासह ३३ धावा फटकावल्या. सेहवाग माघारी परतल्यानंतर पीटरसन आणि महेला जयवर्धने (नाबाद २०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची अभेद्य भागीदारी रचत दिल्लीला विजय मिळवून दिला. पीटरसनने तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. दिल्लीने दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून दोन पराभवांसह चेन्नईची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
 
 
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ८ बाद ११० धावांपर्यंतच मजल मारता आली. पहिल्याच चेंडूवर मुरली विजय धावचीत झाल्यानंतर फाफ डू प्लेसिस (१५) आणि सुरेश रैना (१७) यांनी डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. पण मॉर्ने मॉर्केलने प्लेसिसचा अडसर दूर केल्यानंतर रैनाही धावचीत होऊन माघारी परतला. एस. बद्रिनाथ (१५) आणि रवींद्र जडेजा (१३) यांनी चौथ्या विकेटसाठी २३ धावा जोडल्या. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो (२२) वगळता चेन्नईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

First Published: Wednesday, April 11, 2012, 08:22


comments powered by Disqus