सचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण - Marathi News 24taas.com

सचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण

www.24taas.com, मुंबई
 
सचिन खासदार बनून राज्यसभेत बसणार आहे ही बातमी ऐकून देशभरात तर्क वितर्कांना उधाण आलं. सचिनने राजकारणात यावं की येऊ नये यावर राजकारणी, सचिनचे चाहते यांच्यात मतमतांतरं आहेत. पण सचिनला जवळून ओळखणारे आणि त्याचे काही सहकारी मात्र सचिनच्या या निर्णयाने हैराण झाले आहेत.
 
माजी क्रिकेटपटू आणि सचिनचे जवळचे मित्र संजय मांजरेकर या विषयी म्हणाले, “सचिनचा खासदार बनण्याचा निर्णय ऐकून मला धक्काच बसला. सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट कोच किंवा तत्सम काही काम करेल. एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेईल, असा माझा अंदाज होता. पण तो खासदार होईल असा विचार मी स्वप्नातसुद्धा केला नव्हता.”
 
"सचिन हल्ली प्रत्येक मॅचमध्ये खेळत नाही. रणजी सामन्यातही तो आता नसतो. त्यामुळे तो राज्यसभेसाठी वेळ देऊ शकतो. देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले
 
क्रिकेट विश्लेषक हर्ष भोगले म्हणाले, “सचिनला राज्यसभेचा अनुभव नाही. मी त्याला जवळून ओळखतो. एक सन्मान म्हणून सचिन राज्यसभेत बसेल,  पण सामाजिक मुद्दे मांडण्यासाठी चर्चेत हिरीरीने सहभाग घेणं त्याला जमेल, असं वाटत नाही.” माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला, “सचिन भारतीय क्रीडा क्षेत्रात बदल घडवून आणू शकतो.”
 
 

First Published: Friday, April 27, 2012, 19:10


comments powered by Disqus