गेलची एकाकी खेळी 'फेल' - Marathi News 24taas.com

गेलची एकाकी खेळी 'फेल'

www.24taas.com, कोलकता
 
कर्णधार गौतम गंभीरच्या शानदार ९३ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने उभारलेला १९१ धावांचा डोंगर पार करण्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स तोकडे पडले त्यांना केवळ १४३पर्यंत मजल मारता आली. कोलकताने बंगळुरूचा ४७ धावांनी पराभव केला. ख्रिस गेलने (८६) धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. केकेआरकडून कॅलिसने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.
 
१९० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या बंगळुरू संघाची सुरुवात निराशाजनकच झाली. सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (१) धावांवर बाद झाला. त्याला युसूफ पठाणने भाटीयाकरवी झेलबाद करून माघारी धाडले. विराट कोहलीलाही (१८) कॅलिसने पायचीत केले. बंगळुरूचा मॅच विनर फलंदाज एबी डिवीलियर्सला भोपळाही फोडता आला नाही. कॅलिसनेच त्याचा काटा काढला.
 
सौरभ तिवारी (१९) आणि मयांक अग्रवाल (१०) हेही स्वस्तात बाद झाले. ४ बाद ७७ धावा अशा बिकट अवस्थेत बंगळुरूला गेल सावरेल असे वाटत होते. परंतु, इतर फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीने गेललाही हतबल केले. गेलने ५८ चेंडूत ६ षटकार आणि ७ चौकार ठोकत ८६ धावा केल्या. इतर फलंदाज मात्र केकेआरसमोर हलबत दिसले.
 
तत्पूर्वी, गौतम गंभीर (९३), ब्रँडम मॅकलम (४३) आणि जॅक कॅलिस (४१) यांच्या तुफानी वादळासमोर रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू नेस्तानाबूत झाले. पावसाचे वादळ घोंगावत असलेल्या ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर आज कोलकाता रायडर्सच्या या तीन फलंदाजांनी वादळी खेळी करीत बंगळुरूसमोर १९० धावांचे आव्हान उभे केले.
 
नाणेफेक जिंकून मैदानात उतरलेल्या कोलकाता संघाला मॅकलम आणि गंभीर या सलामीवीरांना ९५ धावांची मजबूत सुरुवात करून दिली. या दोघांनी ९च्या सरासरीने १० षटकात ९५ धावा कुटून काढल्या. ही जोडी बंगळुरूचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी याने मॅकलमला बाद करून तोडली.
 
मॅकलम बाद झाला तरी गंभीर नावाचे वादळ बंगळुरूच्या गोलंदाजाना नेस्तनाबूत करत होते. त्याला जॅक कॅलिसची चांगली साथ मिळाली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी ८० धावा जोडून संघाला १७५ धावांचा पल्ला गाळून दिला. गंभीरने पाच षटकार आणि ९ चौकारांची आतषबाजी करीत ५१ चेंडूंत ९३ धावा कुटल्या. त्याला झहीर खानने बाद केले. गंभीर पाठोपाठ कॅलिसही ४१ धावांवर तंबूत परतला. या तिकडीच्या झंझावाती खेळीमुळे कोलकाताने १९० धावांचा डोंगर उभा केला.
 

First Published: Sunday, April 29, 2012, 09:35


comments powered by Disqus