आयपीएलमुळे केली आत्महत्या... - Marathi News 24taas.com

आयपीएलमुळे केली आत्महत्या...

www.24taas.com, कोल्हापूर
 
आयपीएलवर होत असलेल्या सट्टेबाजीतून  खासगी सावकारी सुरु झाली आहे. सट्टा लावण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी सावकाराकडून तगादा येऊ लागल्यानं कोल्हापुरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएल मधील मनोरंजन आणि खेळाच्या थरारात क्रिकेटरसिक न्हाऊन निघत असले तरी त्याचे आता दुष्परिणामही जाणवू लागले आहेत.
 
आयपीएलची मॅच जितकी मैदानावर खेळली जाते आणि आर्थिक उलाढाल होते त्याहून अधिक उलाढाल सट्ट्यावर होतं असल्याचा अंदाज व्यक्त होतो. परंतू या आयपीएलवर सट्टा लावण्यापायी  एकाला जीव गमावावा लागला आहे. कोल्हापुरजवळच्या गांधीनगरमध्ये सुनिल नागदेव यानं खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन आयपीएलवर सट्टा लावला.
 
परंतू सट्टा हरल्यानं पप्पू सुंदराणी आणि मनू ठक्कराणी या सावकारांनी पैसा परत मिळवण्यासाठी तगादा लावल्यानं सुनिल नागदेवनं रेल्वेखाली आत्महत्या केली. सावकार छळत असल्याची तक्रार पोलिसांत देऊनही दखल न घेतल्यानं माहिती घेण्यासाठी गेलेल्या 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींवरच धावून जाण्याचा प्रताप पोलिसांनी केला. पोलिसांच्या आशिर्वादानेच खुलेआम सट्टा लावला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
 
आयपीएल क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरतं असलं तरी क्रिकेटच्या आहारी जावून त्यातून पैसा मिळवणाऱ्यांसाठी तो आयपीएल जीवघेणा ठरत आहे. या फोफावलेल्या सट्टेबाजीतूनच आता खाजगी सावकारीनंही डोकं वर काढलं असून त्याला पोलीसही रोखू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे.
 
 
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 19:48


comments powered by Disqus