Last Updated: Wednesday, July 10, 2013, 17:22
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई चांगले मार्क, चांगले कॉलेज, असे जर तुम्ही स्वप्न पाहात असाल तर ते तुमचे स्वप्नच राहिल. तुम्ही म्हणाल काय हा चावटपणा आहे? हा चावटपणा नाही तर हकिकत आहे. तीही मराठी मुलीच्याबाबतील. जीवाचे रान करीत आणि परिस्थितीवर मात करत तिने ९१.०९ टक्के मिळविले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती कॉलेज प्रवेशापासून वंचित राहिलेय.
चांगले मार्क मिळवण्यासाठी मुले जिवाचा आटापिटा करतात. चांगल्या मार्क्स मिळवण्याच्या वेडाने त्यांना अक्षरक्ष: झपाटलेले असते. परंतु इतकी जीवतोड मेहनत घेऊन आणि चांगले मार्क मिळवूनही जर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर मात्र मेहनतीचा काहीच उपयोग नाही असे वाटते. असेच काहीसे कांदविलीतील चारकोपच्या अनेरी चव्हाण हिच्याबाबत घडलेय.
अनेरी चव्हाण हिला दहावीच्या परीक्षेत ९१.०९ टक्के मिळाले आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल असे तिला वाटू लागले. मात्र तिच्या या आनंदावर विरजण पडले. ९१ टक्के मिळूनही तिला १३ हजार रुपये भरून ठाकूर कॉलेजच्या विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागलाय. एवढे मार्क मिळवूनही जर मला १३ हजार भरावे लागणार असतील तर माझ्या जीवतोड मेहनतीचा फायदा काय, असा प्रश्न अनेरी विचारतेय.
ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेमध्ये दरवर्षी काही ना काही घोळ होतच असतो. या वर्षी अनेरीने ऑनलाईन अर्जात रुपारेल, पाटकर, साठ्ये, मिठीबाई रुईया, ठाकूर या कॉलेजेसची नावे भरली होती. ठाकूर कॉलेजेमध्ये घेतलेला प्रवेश ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत अपलोड करायला कॉलेज कर्मचारी विसरले आणि अनेरीचे नाव प्रवेशप्रक्रियेतून बाद झाले. त्यामुळे तिला उरलेल्या दोन याद्यांमध्ये बेटरमेंटची संधी मिळालीच नाही. ठाकूर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना याबाबत अनेरीच्या वडिलांनी विचारले असता, त्यांनी मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली. ठाकूर कॉलेजने ‘ह्यूमन एरर’ हे कारण सांगून वेळ मारुन नेली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 10, 2013, 17:18