कॉलेजमध्ये पुन्हा रणधुमाळी , College of election

कॉलेजमध्ये पुन्हा रणधुमाळी

कॉलेजमध्ये पुन्हा रणधुमाळी
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

कॉलेजमध्ये आता निवडणुकांचे फड रंगणार आहेत. विद्यापीठांमध्ये निवडणुका घेण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्याबाबत विविध पक्षनेत्यांशी चर्चा करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत या बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे. तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी आणला जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीवरील बंदी उठविण्याची मागणी करीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

कॉलेजमध्ये निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप यांनी जोर लावला होता. ही निवडणूक पुन्हा सुरू करायची तर विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ४०मध्ये बदल करावे लागतील. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खून, हाणामारीच्या घटनांनंतर ही निवडणूक बंद करण्याची मागणी केली होती. तशी सूचना शरद पवार यांना केली होती. त्यानंतर निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या. कॉलेज निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करूनच सरकारने निर्णय घ्यावा, असे यावेळी सुभाष देसाई म्हणाले. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी या निवडणुकीत एकेकाळी झालेल्या खुनाखुनीची आठवण करून देताना निवडणूक घ्या पण गुन्हेगारी बोकाळणार नाही, हेही बघा, अशी सूचना केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 08:40


comments powered by Disqus