Last Updated: Wednesday, June 18, 2014, 10:36
www.24taas.com, झी मीडिया, पुणेऐकून विश्वास बसणार नाही, पण गेल्या १० वर्षात घडली नाही ती गोष्ट पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये घडली. महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण गणवेशासह शालेय साहित्य उपलब्ध झालंय. त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर कुठलीही लोकोपयोगी योजना अपेक्षित वेळेत राबवणं अवघड नसल्याचं स्पष्ट झालंय.
शाळा सुरु होऊन अवघा एकच दिवस झालाय. तरीदेखील शाळेतल्या जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांच्या अंगावर नवीन गणवेश. सगळ्यांकडे नवी दफ्तरं आणि वह्या पुस्तक. पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या १० वर्षात बघायला न मिळालेलं हे दृश्य यावर्षी बघायला मिळतंय.
महापालिका शिक्षण मंडळातर्फे महापलिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतं. मात्र ते आजवर कधीच वेळेत मिळालं नाही. १५ ओगस्ट उलटला तरी गणवेश मिळत नाहीत, हिवाळा संपला तरी स्वेटर नाही ही शिक्षण मंडळाची आजवरची परंपरा आहे. यावर्षी मात्र चमत्कार घडल्यानं विद्यार्थी आणि पालक दोघेही आनंदात आहेत
पुणे महापालिकेच्या ३०९ शाळांमधल्या सुमारे ९० हजार मुलांना गणवेश तसंच शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय. ठराविक कालावधीमध्ये खरेदी प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे हे शक्य झाल्याचं सांगण्यात येतंय.
खरं तर याच खरेदी प्रक्रियेतले तांत्रिक अडथळे तसंच संबंधितांचे वैयक्तिक `इंटरेस्टस` यामुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य कधीच वेळेत मिळू शकलं नाही. किंबहुना या सगळ्याशी संबंधित घोटाळ्यांमुळे महापालिका शिक्षण मंडळ बदनाम आहे. यावर्षी कुठल्याही कारणाने का होईना, मुलांना गणवेश आणि शालेय साहित्य वेळेत मिळालंय. निश्चितच याचा उपयोग शिक्षण मंडळाची प्रतिमा सुधारण्यासाठी होणार होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 10:25