Last Updated: Wednesday, August 14, 2013, 10:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई महाविद्यालयीन जीवनात संरक्षण दलाची ओळख करुन देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच ‘एनसीसी’चा समावेश आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला जाणार आहे. याला केंद्र सरकार तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलीय. यामुळे एनसीसी हा एक महाविद्यालयातील अतिरिक्त उपक्रम रहाणार नाही तर या वर्षीपासून `मिल्ट्री सायन्स` हा ऐच्छिक विषय निवडत विद्यार्थ्यांना या विषयांत पदवीही घेता येणार आहे.
राज्यात सध्या ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यावर आणि राज्यातील विद्यापीठांनी आवश्यक ती तयारी केल्यावर पुढच्या वर्षापासून हा नियम लागू केला जाणार असल्याचं एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार ‘यूजीसी’नं यासाठी देशातील ३० विद्यापीठांची निवड केली असून तेथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. ‘एनसीसी’नं मिल्टी सायन्स या विषयाचा अभ्यासक्रम तयार करून यूजीसीला दिला आहे. महाविद्यालयांनी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठविल्यास तेथे हा विषय दिला जाईल.
महाराष्ट्रात ‘एनसीसी’चे पुणे, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, मुंबई ए आणि बी असे सात ग्रुप आहेत तर औरंगाबाद अंतर्गत नऊ बटालियन आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 14, 2013, 10:29