Last Updated: Tuesday, May 22, 2012, 16:03
मुकुल कलकर्णी, www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापलाय. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झालेत.
नाशिकच्या रासबिहारी शाळेच्या बाहेर घोषणा देणारे पालक शाळेच्या मनमानीचा निषेध करत आहेत. रासबिहारी शाळेनं तब्बल 63 टक्के फी वाढ केलीय. त्यासंदर्भात शाळेनं पालकांना सकाळी साडे दहा वाजता चर्चेला बोलावलं होतं. पण ऐनवेळी शाळेनं फी वाढीवर ठाम असल्याचं सांगत चर्चेला नकार दिला. त्यामुळे शाळेविरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार नोंदवलीय.
यासंदर्भात मनपाच्या शिक्षण मंडळानंही शाळेना नोटीस बजावलीय. इतकी अवास्तव फी वाढ केल्यानं शाळेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा त्यामध्ये करण्यात आलीय. फी वाढीच्या विरोधात नाशिकमध्ये पालक संघाची स्थापना करण्यात आलीय. त्या माध्यमातून जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. शाळेनं फी वाढीचा निर्णय रद्द केला नाही, तर शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय.
First Published: Tuesday, May 22, 2012, 16:03