Last Updated: Wednesday, June 20, 2012, 18:31
अखिलेश हळवे, www.24taas.com, नाशिक नाशिकच्या रासबिहारी शाळेची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शाळेनं मनमानी करत फी वाढ केली. पालकांनी त्याविरोधात आंदोलन केलं. त्यानंतरही शाळेनं दादागिरी सुरूच ठेवली आहे. आता एक धक्कादायक इशारा शाळेनं दिलाय.
नाशिकच्या रासबिहारी शाळेनं मुजोरीची हद्द केलीय. मुळात मनमानी करत फी वाढ केली. सहाजिकच पालकांनी त्याविरोधात आवाज उठवला आणि शाळेविरोधात आंदोलन केलं. आता या पालकांनी शाळेची जाहीर माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा सुलतानी इशारा शाळेनं दिलाय. शाळेची बदनामी केल्यामुळे नुकसानभरपाई म्हणून पाच लाख आणि खुलाशासाठी शाळेनं जो खर्च केला, त्याचे चार लाख 47 हजार असे एकूण दहा लाख पालकांनी भरावेत, अशी नोटीस देण्यात आलीय. त्यामुळे पालकवर्गातून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकारानंतर पालकांनी शिक्षण मंडळाकडे दाद मागितली आहे. त्यावर शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा शिक्षणाधिका-यांनी दिलाय. रासबिहारी शाळेच्या या सुलतानी कारभारापुढे दबून न जाता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पालकांनी दिलाय.
First Published: Wednesday, June 20, 2012, 18:31