Last Updated: Friday, December 16, 2011, 14:02
झी २४ तास वेब टीम, मुंबई शालेय शिक्षण आता इंटरनॅशनल स्कूल आधुनिक करू पाहतायत. सांताक्रुजच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आयपॅड २, सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सक्तीचं करण्यात आलंय.
सांताक्रुजच्या पोदार इंटरनॅशनल शाळेनं आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर भलतीच सक्ती केली आहे. ६ ते १२ च्या विद्यार्थ्यांना नुकताच बाजारात आलेला ‘आयपॅड २’ पुढील वर्षापासून अभ्यासाचं माध्य़म करायचं ठरवलंय. याबाबत पालकांना पत्रकाद्वारे कळवण्यातही आलं. या पत्रकात विद्यार्थी आयपॅड शाळेतून किंवा बाहेरुन घेऊ शकतात. मात्र तो आयपॅड 'अॅप्पल' कंपनीचाच असावा असं सांगण्यात आलंय. या आयपॅड २ ची बाजारातील किंमत ४० हजार आहे. शाळेच्या या निर्णयाला अनेक पालकांचा विरोध आहे. मात्र भीतीपोटी ते समोर यायला तयार नाहीत. मात्र, शाळेच्या या भूमिकेची शैक्षणिक क्षेत्रात निंदा होतेय.
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपप्रमाणं आयपॅड लहान वयात विद्यार्थ्यांना वापरायला येणं थो़डसं कठीणच आहे. शिवाय आयपॅड विशिष्ट कंपनीचाच का ? असे अनेक प्रश्न पालकांना पडलेत. याबाबत शाळेची बाजू जाणून घ्यायला झी २४ तासची टीम गेली असता, भेटायचं नाही असं उत्तर मुख्याध्यापकांनी दिलं. शिवाय कॅमेऱ्यासही धोका पोहचवण्य़ाचा प्रयत्न केला गेला. त्यामुळेच शाळेची भूमिका संशयास्पद वाटतेय.
First Published: Friday, December 16, 2011, 14:02