सीईटीच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार ऑनलाईन - Marathi News 24taas.com

सीईटीच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार ऑनलाईन

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
सीईटी आणि त्यामध्ये होणारा गोंधळ ही दरवर्षी नित्याचीच बाब झाली आहे. कधी विद्यार्थांच्या परीक्षा केंद्राचा घोळ, तर कधी निकालात होणारी गफलत. यामुळे सीईटीच्या विद्यार्थांना दरवर्षी मनस्ताप भोगावा लागतो. त्यामुळेच यंदा सीईटी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी टाळण्यासाठी उत्तरपत्रिकाच ऑनलाइन टाकण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पुढील वर्षापासून परीक्षेच्या निकालापूर्वीच उत्तरपत्रिका ऑनलाइन देण्यात येणार आहेत.
 
सीईटी परीक्षेच्या निकालानंतर परीक्षेच्या निकालाबाबत अनेक विद्यार्थी साशंक असतात किंवा बरोबर उत्तरे लिहूनही कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी करतात. हे टाळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता यावी यासाठी सीईटी परीक्षेची उत्तरपत्रिकाच ऑनलाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या उत्तराची कार्बन कॉपी देण्यात यावी अशी सूचनाही दिल्याचे टोपे यांनी सांगितले.
 
यापूर्वी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची प्रश्‍नपत्रिकाही देण्यात येत नसे, परंतु सीईटीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी प्रश्‍नपत्रिकाही देण्याबाबत विचार सुरू असल्याचे कळते. शासनपातळीवर याबाबत निर्णय घेता येईल का याबाबत विचारविनिमय सुरू आहे.  उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही बाबींवर चर्चा करण्यात आली.
 

  • एमएचटी-सीईटी 


२०१२ पासून महाराष्ट्रात एमएचटी—सीईटी चे गुण १२ वीचे गुण यांची सरासरी करून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात यावा.
खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांत ३ ते ४ उपकेंद्रे निर्माण करावीत.
सर्व इंजिनीअरिंग कॉलेजसाठी एक प्रवेशप्रक्रिया असावी.
 

  • उच्च व तंत्र शिक्षण विभाग


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यामध्ये एमएचटी—सीईटी परीक्षा घेण्यात येत असल्याने याबाबतची शक्यता तपासण्यात येईल.
प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या सुरक्षेसाठी एकच केंद्राचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून यावर मार्ग काढण्यात येईल.

First Published: Friday, October 21, 2011, 06:31


comments powered by Disqus