Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:18
www.24taas.com, रोहित गोळे, नेरळ 
Not me, but You असं ब्रीदवाक्य असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनाचं (NSS) स्वयंसेवक गेले काही दिवस रंगले होते ते त्यांच्या निवासी शिबीरात. निमित्त होतं ते म्हणजे, मुंबई विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) सातदिवसीय निवासी शिबीर. माथेरानजवळील नेरळ या गावी हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. कल्याण येथील लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालयाने हे शिबीर भरविले होते.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यातील विद्यार्थी या निवासी शिबीरात दाखल झाले होते. जवळजवळ 250 विद्यार्थी या शिबीरात दाखल झाले होते. सोनावणे महाविद्यालयाचे एनएसएस अधिकारी प्रा. जीवन विचारे, प्रा. उमेश शिंदे आणि प्रा. शिवाजी विचारे यांनी या शिबाराची धुरा समर्थपणे संभाळली. विद्यापीठ स्तरिय शिबीरात महाविद्यालयीन विद्यार्थींनिचा सहभाग लक्षणीय होता.
या विद्यापीठ शिबीराचा मुळ हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एकणूच सामाजिक जाणीव निर्माण व्हावी याच हेतूने ह्या शिबीराची रचना करण्यात आली होती. त्याचसोबत शहरी जीवन जगताना ग्रामीण भागाचा पूर्णत: विसर पडलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागाशी असलेली आपली नाळ आणि असलेलं नातं याची जाणीव झाली पाहिजे हा मुख्य विचार या शिबीरामागे होता. तसचं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSC आणि UPSC यांच्या पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी याच्या मार्गदर्शनासाठी अनेक IPS आणि IAS अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे अश्या मोठ्या अधिकाऱ्य़ांच्या अनुभवाचा फायदा या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

IPS आणि IAS अधिकारी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी यांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शानासोबत काही क्लृप्त्या आणि काही नवीन गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. शिबीरात शिस्त आणि आयोजन यांचा सुरेख मेळ होता, मुलांच्या सर्वांगिण विकास व्हावा यासाठी या शिबीरात वेगवेगळे कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते. त्यांने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळविण्यास नक्कीच मदत होईल.
First Published: Sunday, February 5, 2012, 17:18