दहावी-बारावी निकालाचं यंदा काही खरं नाही - Marathi News 24taas.com

दहावी-बारावी निकालाचं यंदा काही खरं नाही

www.24taas.com, पुणे
 
दहावी आणि बारावी यांच्या निकालामध्ये दरवेळेसच काहीतरी घोळ हा होतच असतो. तिच पंरपरा  यावर्षी देखील कायम राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता आहे. राज्यातल्या कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातला आहे. अशा शाळांमधले सुमारे पंधरा ते वीस हजार शिक्षक पेपर तपासण्याचं काम करतात. या सगळ्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासायला नकार दिला आहे.
 
शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात  औरंगाबादमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली होती. यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अन्यथा दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला होता. आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि याकारणास्तव शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे.
 
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बारावीचे पेपर्स तपासण्यास नकार दिला आहे. कायम विना अनुदानितमधील कायम हा शब्द काढून टाकून अनुदान द्यावं अशी त्यांची मागणी आहे. पेपर तपासणार नाही असं कळविल्यानंतरही विभागीय बोर्डानं पेपर दिल्यानंतर सर्व शिक्षकांनी पेपर विभागीय मंडळात आणून टाकले आहेत. यामुळे पेपर तपासणीवर परिणाम होणार आहे. आणि यामुळेच निकाल देखील लांबण्याची चिन्ह दिसत आहे.
 
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 17:05


comments powered by Disqus