अभियांत्रिकीची मराठीत सामायिक परीक्षा! - Marathi News 24taas.com

अभियांत्रिकीची मराठीत सामायिक परीक्षा!

www.24taas.com, मुंबई
 
 
देशभरात २०१३-१४ पासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी इंडियन सायन्स इंजिनिअरिंग एंट्रन्स टेस्ट  ही सामायिक परीक्षा (आयसीट) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठीतून देता यावी, अशी परवानगी मागण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.
 
 
 
पुढील वर्षीपासून सुरू करण्यात येणारी इंडियन सायन्स इंजिनिअरिंग एंट्रन्स टेस्ट  राज्यातील विद्यार्थ्यांना मराठीतून देता यावी यासाठी राज्य सरकार केंद्राकडे मागणी करील. त्याचप्रमाणे बारावीतील गुणांना किती वेटेज असावे यासाठी लवकरच ८  सदस्यीय समिती स्थापण्यात येणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी आयसीट परीक्षेतील गुणांना ५० टक्के व १२ वीच्या परीक्षेतील गुणांना ५० टक्के महत्त्व देण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे, त्याबाबतही येत्या दोन महिन्यांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
विधान परिषदेत डॉ. दीपक सावंत यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. नव्या प्रवेश परीक्षेच्या अनुषंगाने ११ वी व १२ वीचा सुधारित अभ्याक्रम तयार केला आहे काय आणि औषधनिर्मिती शास्त्राची प्रवेश परीक्षा कोण घेणार, अशी विचारणा केली. त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना टोपे यांनी सांगितले की, सध्या विद्यार्थ्यांना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयटी व केंद्रीय स्तरावरील कोटा पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी तीन-तीन परीक्षा द्याव्या लागतात. त्याचा ताण विद्यार्थ्यांवर पडतो. त्याचा विचार करून केंद्रीय स्तरावर इंडियन सायन्स इंजिनीयरिंग एलिजिबिलिटी टेस्ट (आयसीट) परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
 
 
 
नव्या स्वरूपातील परीक्षा २०१३-१४ या वर्षांपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. एकूण सहापैकी पाच पुस्तके छापून बाजारात विक्रीसाठी आली आहेत. रसायनशास्त्र भाग दोन या विषयाची पुस्तके अजून बाजारात आलेली नाहीत, तीही लवकरच येतील.  अभियांत्रिकीसाठी राष्ट्रीय स्तरावर एकच सामायिक परीक्षा आयसेट ठेवण्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे देशातील सर्व बोर्डांचा अभ्यासक्रम एकच असावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. बारावी परीक्षेचे महत्त्व कमी होऊ नये यासाठीही आमचे प्रयत्न असतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

First Published: Tuesday, April 10, 2012, 11:30


comments powered by Disqus