रेल्वेचा खोळंबा, विद्यार्थ्यांना फटका - Marathi News 24taas.com

रेल्वेचा खोळंबा, विद्यार्थ्यांना फटका


www.24taas.com, मुंबई
 
 
कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने  विस्कळीत झालेल्या रेल्वे  सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला. मात्र, याची दखल घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी वेळ वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. तर ज्यांची परीक्षा चुकली त्यांची नव्याने घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
 
 
मध्य आणि हार्बर रेल्वे खोळंब्याचा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही बसल्याने मुंबई विद्यापीठाच्या आज अनेक विषयांच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान,  ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचायला उशीर होईल त्यांना वेळ वाढवून देण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा केंद्रांना दिला आहे. मात्र, ज्यांना पेपरला जाणे शक्य झाले नाही. त्यांचे पेपर पुन्हा घेण्याबाबत मुंबई विद्यापीठ योग्य तो निर्णय घेईल, असे आश्वासन परीक्षा विभागाचे नियंत्रक  डॉ. सुभाष देव यांनी दिले.
 
 
जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत किंवा पोहचू शकत नाहीत, अशांच्या   किती तक्रारी येतात हे पाहिले जाईल. त्यानंतर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासनही विद्यापीठाने दिले आहे. डॉ. सुभाष देव यांनीही विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचे म्हटले आहे.

First Published: Wednesday, April 18, 2012, 16:05


comments powered by Disqus